वसईचा किल्ला १११ मशाली व ११,१११ दिव्यांनी उजळला !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 10:20 PM2024-11-02T22:20:02+5:302024-11-02T22:20:37+5:30

आमची वसई' सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम राबविण्यात आला.

Vasai fort lit up with 111 torches and 11,111 lamps! | वसईचा किल्ला १११ मशाली व ११,१११ दिव्यांनी उजळला !

वसईचा किल्ला १११ मशाली व ११,१११ दिव्यांनी उजळला !

वसई : नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे 'आमची वसई' सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे 'वसई दुर्ग दीपोत्सव' उत्साहात साजरा करण्यात आला. १११ मशाली व ११,१११ दिव्यांनी वसईचा किल्ला उजळून निघाला. 'आमची वसई' सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम राबविण्यात आला.

शनिवार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ पासून दीपोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. वसईतील कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने रांगोळी व कंदील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य उपस्थित होते. 

 पोर्तुगीजांच्या अमानुष जाचामुळे हतबल व असहाय्य झालेल्या वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१००० मराठे हुतात्मा झाले, अनेकांच्या अर्धांगिनी स्वेच्छेने सती गेल्या. आपल्या घरी दिवाळी- दसरा साजरी व्हावा म्हणून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा व जीवाचा त्याग केला. दिवाळीत एकीकडे संपूर्ण वसई - विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर, चर्च, मॉल्स, रस्ते प्रकाशमान होऊन झगमगत असतात, तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा व बलिदानाचा साक्षीदार असलेला दुर्ग जंजीरा वसईचा किल्ला मात्र अंधारात असतो. पूर्वापार काही स्थानिक परिवार व धर्मसभा वसई किल्ल्यातील नागेश महातीर्थ व श्री नागेश्वर मंदिर परिसरात दीपावली साजरी करतात.

मराठा सैन्यामुळे व भारतीय जवानांमुळे आपण आज दिवाळी आनंदात साजरी करीत आहोत. त्या पराक्रमी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी 'आमची वसई' सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे वसई किल्ल्यात दीपोत्सव साजरा करण्याचे ठरविले. दीपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून व रंगबेरंगी रांगोळ्या काढून, आकाशकंदील लावून नरवीर चिमाजी आप्पा स्मारक उजळवण्यात आले. प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर व नागेश महातीर्थावरही पणत्या व तोरण लावून रांगोळी काढण्यात आल्या. नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे 'वसई दुर्ग दीपोत्सव' साजरा करण्यात आला. १११ मशाली व ११,१११ दिव्यांनी वसईचा किल्ला उजळून निघाला.

Web Title: Vasai fort lit up with 111 torches and 11,111 lamps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.