वसई - पनवेल मार्गावर लवकरच धावणार लोकल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:15 AM2019-09-25T00:15:26+5:302019-09-25T00:15:53+5:30
वसई ते पनवेल लोकल चालवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
वसई : वसई - दिवा मार्गावर आता वसई ते पनवेल लोकल चालवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
ही लोकल सेवा लवकरच सुरू व्हावी, यासाठी एमआरव्हीसी (मुंबई रेल विकास प्राधिकरण) याबाबत तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभ्यास करून आपला अहवाल रेल्वेला सादर करणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच ही वसई - पनवेल लोकल गाडी धावू शकेल. यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका बैठकीत याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे आता मुंबई रेल विकास प्राधिकरणाने ही लोकल चालवण्यासंदर्भात फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यास सुरु वात केली आहे.
दरम्यान, सद्यस्थितीत वसई ते पनवेल या मार्गावर मेमू गाडी धावत असून वसई ते पनवेल हे अंतर पार करायला मेमू गाडी तब्बल दीड तास घेते. या दीड तासांच्या दरम्यान एकूण १४ स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावर वसई रोड, जुचंद्र, कामण, खारबाव, भिवंडी, कोपर, डोंबिवली, दिवा (जं), दातिवली, निळजे, तळोजा, नावदे, कळंबोली आणि पनवेल अशी १४ स्थानके आहेत. पैकी तळोजा, भिवंडी, दातिवली, कळंबोली ही चार स्थानके महत्त्वाची आहेत. या मार्गावर लोकल चालवल्यास त्याचा मोठा फायदा येथील लोकसंख्येला होऊ शकतो. मात्र त्यासाठी या मार्गावर अनेक तांत्रिक बदल करावे लागणार आहेत.
रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले असून या मार्गावर प्रवास करण्याऱ्यांना रेल्वेने सुखद धक्का दिल्याची प्रतिक्रि या प्रवाशांनी लोकमतला दिली.