वसईच्या बाजारात रानमेवा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:15 PM2019-05-02T23:15:23+5:302019-05-02T23:15:39+5:30
जांभूळ, करवंद, आंबा : रासायनिक प्रक्रिया नसल्याने ग्राहकांची पसंती
पारोळ : आंबा अशा मोठ्या फळांबरोबर आपले अस्तित्व टिकवून ठेवलेला रानमेवा उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत दृष्टीस पडतो. या महिन्यात जांभूळ, राजन, करवंद, जाम वसईच्या बाजारात दाखल झाली असून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रानमेवा बाजारात दाखल झाल्याने उन्हाच्या काहिलीपासून लोकांना दिलासा देण्यास पूरक ठरते आहे.
हजारो वर्षांपासून चालत आलेली रानमेव्याची परंपरा काळाच्या ओघात बदलत गेली असली तरी आदिवासी समाजात अन्नाचा घटक म्हणून मान्यता असलेल्या रानमेव्याचे महत्त्व कमी झालेले नाही. रानावनात अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्य करून राहिलेला आदिवासी समाज अनेक गोष्टींवर आपली उपजीविका चालवतात. त्यामुळे आदिवासींना हंगामी रोजगाराचे साधन उपलब्ध होते.
उन्हाळ्यात मध, करवंदे, गावठी आंबे, तोरणे, पायरी, पिंपळाची फळे, आवळा, रान फणस, ताडगोळे, भोकर, जाम, जांभळे गोळा करतात आणि बाजारात येऊन विकतात. वर्षांतून एकदाच आस्वाद घ्यायला मिळणारी ही फळे वसईच्या बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांचा रानमेव्याकडे चांगलाच कल दिसून येत आहे. सफरचंद, संत्री अशा फळावर सुखावणारे ग्राहक आता सध्या रानमेव्याची खरेदी करताना दिसत आहेत. खेडयापाडयातून आलेल्या महिला टोपल्यातून ही फळे विकायला बसलेल्या बाजारात दिसत आहेत.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाडयात ही फळे खूप लाभदायक ठरतात. वेगवेगळया रोगांवर ती गुणकारी मानली जातात. सफरचंद, संत्री, आंबा, टरबूज, डाळिंब, चिकू, केळी या फळांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रि या करण्यात येते, त्यामुळे ही फळे आरोग्याला घातक असल्यामुळे रानमेव्याच्या रूपाने आरोग्यवर्धक पर्याय लोकांसाठी उपलब्ध आहे. आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या या रानमेव्याचा भाग असलेली करवंदे आदिवासी बांधवांना एप्रिल अखेरपासून ते जूनपर्यंत साधारणपणे अडीच महिने रोजगार मिळवून देते.
भरपूर मागणी
वसईच्या बाजारात १० रु पये एक वाटा या दराने ही करवंदे, जांभूळ विकली जातात. एका टोपलीत साधारणपणे ५० ते ६० वाटे असतात. त्यानुसार दिवसभरात ४५० ते ५०० रुपये त्यांना मिळत असल्याचेही रानमेवा विक्र ेत्या महिलांनी सांगितले. पाणीदार ताडगोळे शरीरातील उष्णता कमी करतात. त्यांनाही मागणी आहे