वसई महापालिकेचे रुग्णालय ‘आजारी’; डॉक्टरांची कमतरता तर उपकरणांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:56 PM2020-01-14T22:56:01+5:302020-01-14T22:56:22+5:30

नालासोपारा येथील महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक उपकरणांची लवकरच पूर्तता करण्यात येणार आहे.

Vasai Municipal Hospital 'Sick'; If the doctor is lacking, make equipment | वसई महापालिकेचे रुग्णालय ‘आजारी’; डॉक्टरांची कमतरता तर उपकरणांची वानवा

वसई महापालिकेचे रुग्णालय ‘आजारी’; डॉक्टरांची कमतरता तर उपकरणांची वानवा

googlenewsNext

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेचे नालासोपारा पूर्वेकडील नगीनदासपाडा परिसरातील रुग्णालयच ‘आजारी’ असल्याचा आरोप होत आहे. या रुग्णालयात सिटी स्कॅन आणि एमआरआईची सुविधा उपलब्ध नाही. सोनोग्राफीची सुविधा आहे, पण जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा ती बंद असते. १०० खाटांच्या या रुग्णालयामध्ये फक्त २५ खाटा उपलब्ध आहेत. येथे डॉक्टरांचीही कमतरता आहे. पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रात औषधांचा तुटवडा आहे, तर कुठे मुदत संपलेली औषधे, गोळ्या गरीब रुग्णांना विकल्या जात आहेत. यामुळे स्थानिकांत संताप आहे.

या रुग्णालयाच्या स्टोअर रूममध्ये औषधांचा दुष्काळ आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना बाहेरून औषधे, गोळ्या खरेदी कराव्या लागत आहेत. असाच प्रकार पालघर जि.प. रुग्णालयातही आहे. वसई-विरारमधील जनता शहरातील दुर्गंधी व कचऱ्यामुळे वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहे. या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर आणि उपचारासाठी महत्त्वाची उपकरणे उपलब्ध होण्याची रुग्ण आतुरतेने वाट पाहत आहेत.
नालासोपारा आणि वसईतील मनपाच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधेची स्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. महापालिकेच्या स्थापनेनंतर वादे वाढले, दावे वाढले आणि बजेटही वाढले, पण स्थिती आजही तीच आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारीपद असो व अन्य कोणतेही वैद्यकीय पद असो ते त्या योग्यतेनुसार भरलेले नाही. महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस नसून बीएएमएस आहेत. मनपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बजेट नसल्यामुळे एमबीबीएस डॉक्टरांऐवजी बीएमएस डॉक्टरांच्या सहाय्याने महानगरपालिकेचा आरोग्य विभाग चालवला जात आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा आरोप आहे की, मनपाचे डॉक्टर, जनऔषधी केंद्राचे संचालक आणि खाजगी मेडिकल यांच्यामुळे येथे औषधांचा तुटवडा जाणवत आहे.

अंदाजे ३० लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेकडे फक्त दोनच सरकारी रुग्णालये आहेत. येथे डॉक्टरांची कमतरता असून आवश्यक तपासणी उपकरणांचीही वानवा आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही हॉस्पिटलमध्ये ओपीडीमध्ये दररोज ७०० ते ८०० रुग्ण येतात. इथे सिटी स्कॅन व एमआरआयची सुविधा उपलब्ध नाही. सोनोग्राफी मशीन आहे पण कधी कधी तीही बिघाड झाल्याने बंद असते. कागदावर ३ एमबीबीएस डॉक्टर, १९ स्पेशलिस्ट व ८० बीएएमएस डॉक्टर असल्याचे नमूद आहे, पण हकीकत काही वेगळीच आहे. डॉक्टरांचे नेतृत्व करणाºया मुख्य वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस नाही. आपत्कालीन व्यवस्था आणि अतिआवश्यक व्यवस्था सुद्धा नसल्यासारखीच आहे.

नालासोपारा येथील महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक उपकरणांची लवकरच पूर्तता करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत ती पदे भरली जातील. तसेच बाकीच्या सोयी-सुविधांची माहिती घेऊन रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवल्या जातील याकडे लक्ष घालणार आहे.- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई-विरार महानगरपालिका

या हॉस्पिटलमध्ये ओपीडी डिस्पेनसरी तसेच सामान्य आजारांची औषधे उपलब्ध असून बाकीची औषधे बाहेरच्या मेडिकलमधून विकत आणावी लागतात. जास्त रुग्णांना उपचारासाठी खाटांची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपवावे लागते. - विजय जाधव, एका रुग्णाचे संतप्त नातेवाईक

Web Title: Vasai Municipal Hospital 'Sick'; If the doctor is lacking, make equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.