वसईमध्येच हवे नवीन पोलीस आयुक्तालय; तालुक्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:04 AM2020-09-07T00:04:00+5:302020-09-07T00:04:11+5:30
पोलिसांच्या वर्चस्वाची गरज
- मंगेश कराळे
नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. एकीकडे पोलीस गुटखा, दारू, रेती, ड्रग्स माफिया यांच्यावर वचक ठेवत असले तरी हत्या, मारामारी, चोरी, दरोडे, लुटमार, बलात्कार, विनयभंग, अपहरण आदी गंभीर गुन्ह्यांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. विशेषत: वसई तालुक्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मीरा-भार्इंदर-वसई विरार नवीन पोलीस आयुक्तालयाला राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. यामुळे याच भागात पोलीस आयुक्तालय असावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
राज्य सरकारने कडक शिस्तीचे आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले सदानंद दाते यांची पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली. त्यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वसई तालुक्याअंतर्गत असलेले तुळिंज, विरार आणि वालीव पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत. वसई, विरार, पालघर आणि बोईसरमध्ये दररोज लोंढेच्या लोंढे येत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली, पण येथे असे काही गुन्हे समोर आले आहेत की, अन्य राज्यांची पोलीस यंत्रणा ज्या मोस्टवाँटेड गुन्हेगारांचा शोध घेत आहे, ते या पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, वसई, विरार या परिसरात बिनधास्त आश्रय घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगारांना किंवा मोस्टवाँटेड गुन्हेगारांना लपण्यासाठी स्वस्तात घरे भाड्याने उपलब्ध होत असल्याने नालासोपारा शहर सगळ्यात सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्र्षांपासून नालासोपारा शहराचे नाव गुन्हेगारी, दहशतवादी घडामोडी, नकली नोटा, बांग्लादेशी यांच्याशी जोडले गेलेले आहे. या ना त्या घटनांमुळे नालासोपारा शहराचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. मुंबई पोलीस, क्राईम ब्रँच, एटीएस तसेच अन्य राज्यांतील पोलीस गुन्हेगार शोधण्यासाठी किंवा पकडण्यासाठी नालासोपारा शहरात अनेक वेळा आल्याचे निदर्शनास आले आहे.
आम्ही सर्व संभाव्य पर्याय शोधत आहोत. तयार परिसराची उपलब्धता बघून लवकर काम सुरू करण्यात येईल. याबाबत माहिती घेऊन लवकरच बोलू.
- सदानंद दाते, पोलीस आयुक्त, मीरा-भार्इंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय