वसईत पंचायत समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:30 PM2019-12-19T23:30:05+5:302019-12-19T23:30:11+5:30
पक्ष समीकरणाकडे मतदारांचे लक्ष : राजकीय पक्षांच्या कार्यालयांत इच्छुकांची भाऊगर्दी
सुनिल घरत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : वसई तालुक्यातील आठ गणांसाठी व चार जिल्हा परिषद गटासाठी निवडणुकीची ७ जानेवारीला निवडणूक होत असल्याने व उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख १८ ते २३ डिसेंबर असल्याने निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गणिते बदलली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा हेच चित्र दिसणार का? कोण कोणाशी आघाडी करतेय? याकडे वसईतील मतदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ कमी असल्याने रात्र थोडी सोंगे फार अशीच स्थिती उमेदवारांची झाली आहे.
वसई तालुका नागरी, सागरी व डोंगरी अशा स्वरूपात विस्तारला असून या तालुक्यात ३१ ग्रामपंचायती आहेत. काही गावांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने सहा जागा व जनआंदोलनने दोन जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी शिवसेना व जनआंदोलन यांची युती होती. मात्र बहुजन विकास आघाडीने पंचायत समितीवर सत्ता मिळवली होती.
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्याने वसई पंचायत समितीचीही गणिते बदलणार आहेत. बहुजन विकास आघाडीने राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात आघाडी एकत्र लढल्यास यामध्ये बहुजन विकास आघाडी सामील का, हाही एक प्रश्नच आहे. तर श्रमजीवी संघटना ही आपले पत्ते उघड करत नसल्याने त्यांनीही पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपही स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर महाविकास आघाडीने वसई पंचायत समिती निवडणूक लढवली तर काँग्रेस व राष्ट्रवादीलाही वाटा द्यावा लागेल. मागील निवडणूक सर्व पक्ष एकत्र येत बहुजन विकास आघाडीविरोधात निवडणूक लढवल्याने या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, श्रमजीवी संघटना वसई पुरती का होईना मोट बांधते का, याकडेही वसईकरांची नजर लागली आहे. वसई तालुक्यातील आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईतील आठ गणांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये चार गणांमध्ये महिलांचे आरक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील भाताणे, मेढे, तिल्हेर, चंद्रपाडा, अनार्ळा, अनार्ळा किल्ला, कळंब, वासळई या आठ गणांवर पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत झाली. यामध्ये भाताणे गणासाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, मेढे आणि अर्नाळा किल्ला गणासाठी सर्वसाधारण जागा, तिल्हेर गणासाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, चंद्रपाडा आणि कळंब येथे अनुसूचित जमाती महिला, तर वासळई गणासाठी सर्वसाधारण महिला आणि अर्नाळा येथे अनुसूचित जमाती अशा जागा आरक्षित केल्या आहेत.
रात्र थोडी सोंगे फार
च्उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ खूपच कमी असल्याने रात्र थोडी सोंगे फार अशीच स्थिती उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची झाली आहे.
च्यात जातपडताळणी महत्त्वाची असल्याने तिची पावती मिळाली नाही तर इच्छुक असूनही उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही. यामुळे पक्ष कार्यालयात इच्छुकांची गर्दी होत असून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचीही डोकेदुखी वाढली आहे.