वसई महसूल विभागाने आवळल्या रेतीमाफीयांच्या मुसक्या; पंप ,इंजिन अन् पाईप केले नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:52 AM2021-09-07T09:52:30+5:302021-09-07T09:52:43+5:30
खानिवडे,चिमणे खर्डी, वैतरणा आणि कोपर या रेतीबंदरावरील विविध असे 25 सक्शन पंप ,इंजिन व पाईप नष्ट करण्यात महसूल विभागाला आले यश
- आशिष राणे
वसई- कोविड काळात पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या विविध रेतीबंदरावर महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले होते त्याचाच फायदा वसई विरारच्या पूर्वेतील रेतीमाफियांनी घेतला होता मात्र तक्रारी वाढल्यावर पालघर जिल्हा प्रशासनाचे बंद डोळे उशिरा का होईना ते उघडले व त्यानंतर सोमवार (दि.6) वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या नेतृत्वाखाली रेती माफीयांची सर्वच साहित्य नष्ट करण्यासाठी एक संयुक्त मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेत तहसीलदार वसई यांनी आपल्या तलाठी व मंडळ अधिकारी आणि अन्य महसूल कर्मचारी वर्गांच्या मदतीने सोमवारी दिवसभर रेतीबंदरवर भेटी दिल्या आणि तेथील रेती व बोटी संदर्भातले उपलब्ध साहित्य नष्ट व निकामी केल्याची माहिती वसईचे नायब तहसीलदार उमाजी हेळकर यांनी लोकमतला दिली
वसई महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वसई विरारच्या खानिवडे सहित अन्य तीन अशा चिमणे खर्डी, वैतरणा आणि कोपर रेती बंदरावर वसई प्रांत यांच्या मार्गदर्शनखाली वसई तहसीलदारांनी दि.6 सप्टेंबर रोजी दिवसभर ही कारवाई मोहीम राबवली या एकूणच कारवाईत लाखों रुपये किंमतीचे जवळपास 25 सक्शन पंप, सक्शन पाईप,नष्ट करण्यात आले तसेच बोट इंजिन,सक्शन पंप इंजिन देखील साखर टाकून निकामी करण्यात आले.
वसई महसूल विभागाने आवळल्या रेतीमाफीयांच्या मुसक्या; पंप ,इंजिन अन् पाईप केले नष्ट pic.twitter.com/kOFBvruqlG
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2021
दरम्यान या धडक कारवाईसाठी वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या समवेत वसई तहसीलदार उज्वला भगत तसेच मेरी टाइम बोर्डाचे साटलेकर यांच्या उपस्थितीत महसूल विभागाचे 30 तलाठी 6 मंडळ अधिकारी आणि अन्य महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांचा फौजफाटा दिवसभर रेतीबंदरावर उपस्थित होता. एकूणच पालघर जिल्ह्यासहित पालघर व वसई तालुका महसूल प्रशासनाने अति दुर्लक्ष केल्यानंतर विषयाचे गांर्भीय लक्षात घेऊन नागरिकांच्या तक्रारीवरून ही मोहीम राबविण्यात आल्याची चर्चा दिवसभर ऐकू येत होती