वसई रोड नव्हे, हे आहे असुविधांचे जंक्शन

By Admin | Published: January 22, 2016 02:01 AM2016-01-22T02:01:38+5:302016-01-22T02:01:38+5:30

लोकल ट्रेन आणि दिवा-पनवेल मेमूसह पश्चिम, मध्य आणि उत्तर रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या किमान २५ गाड्यांचा थांबा असलेले वसई रोड रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेवरील मिनी

Vasai Road, this is the junction of inconvenience | वसई रोड नव्हे, हे आहे असुविधांचे जंक्शन

वसई रोड नव्हे, हे आहे असुविधांचे जंक्शन

googlenewsNext

वसई : लोकल ट्रेन आणि दिवा-पनवेल मेमूसह पश्चिम, मध्य आणि उत्तर रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या किमान २५ गाड्यांचा थांबा असलेले वसई रोड रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेवरील मिनी जंक्शन मानले जाते. पण, रेल्वेने प्रवाशांना प्राथमिक सुविधा न दिल्याने वसई रोड रेल्वे स्टेशन असुविधांचे महाजंक्शन बनले आहे.
वसई रोड रेल्वे स्टेशनवर सात फलाट आहेत. यातील एक ते पाच क्रमांकाच्या फलाटावून लोकल ट्रेनची ये-जा असते. फलाट क्रमांक एकपासून असुविधांचा पाढा सुरु होतो. मुख्य स्टेशनपासून दूरवर असलेला फलाट क्रमांक एकवर वारांगना, गर्दुल्ले, भिकारी, प्रेमी युुगुलांचा वावर असतो. पोलिसांचे त्यांना अभय असल्याने प्रवाशांना त्यांचा त्रास मुकाट्याने सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. या फलाटावर पंखे, विजेचे दिवे यांची कमतरता आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधुक प्रकाशात याठिकाणी समाजकंटकांची गैरकृत्ये सुरु असतात.
या रेल्वे स्टेशनवरून लोकल आणि लांबपल्ल्यांच्या गाड्या मिळून दिवसाला किमान एक लाख चाळीस हजारांच्या आसपास प्रवासी ये-जा करीत असून त्यातून रेल्वेला दरदिवशी दहा लाखाच्या घरात उत्पन्न मिळते. वसई रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सोय नाही. गैरसोयीच्या वसई रोड रेल्वे परिसरात गेल्या वर्षभरात अपघातात ५५ जणांनी आपला जीव गमावला आहे.
फलाट क्रमांक एक हा जंक्शनवरील सर्वात घाणेरडा आणि गैरधंद्याचे आगार असलेला फलाट आहे. फलाट क्रमांक दोन, तीन, चार आणि पाचवरून बहुतांश लोकलची ये-जा आहे. पण, एकाही फलाटावर स्वच्छतागृहाची सोय नाही. फलाट क्रमांक दोन-तीनवर एक स्वच्छतागृह होते. पण, पादचारी पुलाच्या कामामुळे तेही नेस्तनाबूत करण्यात आले. फलाट क्रमांक दोन-तीनवर एक जुनी पाणपोई आहे. पण, अतिशय घाणेरड्या स्थितीत असलेल्या पाणपोईकडे कुणी ढुंकूनसुद्धा पहात नाही.
फलाट क्रमांक एकवर एकही कँटीन नाही. फलाट क्रमांक चार व पाचवर देखील कुठल्याही प्राथमिक सुविधा नाहीत. या पाचही फलाटांवरून लोकलची ये-जा असते. चार व पाचवरुन लांबपल्ल्यांच्या गाड्याही सुटतात. याही फलाटांवर स्वच्छतागृह आणि पाणपोई नाही. त्यामुळे लोकलने प्रवास करून थकून भागून आलेल्या प्रवाशांना नैसर्गिक विधी करायची सोय नाही. पिण्याचे पाणी स्टॉलवरून विकत घ्यावे लागते.
सध्या रेल्वेने फलाटावर अनेक कामे सुुरु केली आहेत. त्यासाठी रेती, माती, खडीचे फलाटांवरच ढीग लागलेले आहेत. गर्दीच्या वेळी धावपळ करणारे अनेक प्रवासी त्यामुळे पडताना दिसतात. सर्वच फलाटांची उंची कमी असल्याने प्रवाशांना चढ-उतार करताना त्रासदायक होते. सर्वच फलाटांवर पुरेसे पंखे नाहीत. बसायला पुरेशी बाके नाहीत. इंडिकेटरची संख्या देखील अपुरी
आहे. फलाट क्रमांक एकवर दोन्ही दिशांना तिकीट खिडक्या आहेत. प्रवासी संख्येच्या मानाने त्या अपुऱ्या आहेत. पश्चिमेला एकच तिकीट खिडकी आहे. त्याठिकाणी चार खिड्क्या आणि पाच एटीव्हीएम मशिन्स आहेत. त्याही कमी पडत असल्याने तिकीटांसाठी लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. फलाट क्रमांक चार, पाच, सहा आणि सातवरून दिवा आणि पनवेल मेमूसह लांबपल्ल्यांच्या पंचवीसहून अधिक गाड्यांची ये-जा आहे. त्या गाड्यांना बराच काळ थांबाही आहे. पण, एकाही फलाटावर स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. गाडीचा वाट पहात असलेल्या प्रवाशांना बसायला पुरेशी बाके नाहीत. फर्स्टक्लासच्या प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष नाही. लांबपल्लयांच्या गाडया इतक्या मोठ्या प्रमाणावर असताना डब्या दर्शक इंडिकेटर नाहीत. त्यामुळे गाडी आली की डब्या शोधण्यासाठी प्रवाशांना अवजड सामान, मुले, वयस्कर लोकांना घेऊन पळापळ करावी लागते. विशेष म्हणजे सातही फलाटांना अद्याप पूर्णपणे छप्पर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे ऊन आणि पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. रेल्वेच्या सर्व स्टेशनला जोडून पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सबवे कधीच मंजूर झाला आहे. पण, गेल्या दहा वर्षांपासून सवबेचे काम रखडून पडले आहे.

Web Title: Vasai Road, this is the junction of inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.