वसई तालुका गुजरातमध्ये, गुज्जू व्यावसायिकांचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:23 AM2018-03-14T03:23:05+5:302018-03-14T03:23:05+5:30
महाराष्ट्रातून हद्दपार करून त्याचा गुजरात राज्यात समावेश करण्याचा प्रताप काही व्यावसायिकांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
वसई : या तालुक्याला महाराष्ट्रातून हद्दपार करून त्याचा गुजरात राज्यात समावेश करण्याचा प्रताप काही व्यावसायिकांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील घोडबंदर ते तलासरी दरम्यानच्या बहुतांश धाबे, दुकाने, हॉटेलांवर आता गुजराती पाट्या झळकू लागल्या आहेत. या पाट्यांवरून मराठीला तडीपार केल्याचे दिसत असतांना आता वसई तालुक्यातही गुजराती फलक झळकू लागले आहेत. इतकेच नाही तर वसई तालुका महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये असल्याचे उघडपणे लिहिण्याचे धाडस गुजराती समाजाकडून केले जात आहे.
तालुक्यातील गुजराती व्यावसायिक आणि उद्योजकांनी आपल्या वसईतील पत्त्यातील राज्याच्या रकान्यात महाराष्ट्रा ऐवजी गुजरात राज्य असा उल्लेख करून वसई गुजरात राज्यात असल्याचे उघडपणे लिहीण्यास सुरुवात केली आहे. वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमधील एका उद्योजकाने राजप्रभा इंडस्ट्रीयल इस्टेट, शॉप क्रमांक ४, बिल्डींग क्रमांक १ असा पत्ता लिहीताना त्यात राज्य महाराष्ट्र लिहीण्याऐवजी गुजरात राज्य असा उल्लेख करून गुजरात राज्यातील हा ३८४३४० पिनकोडही टाकला आहे.
वसईसह पालघर जिल्हयाचा गुजरातमध्ये समावेश करण्याचा कट शिजला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणी खळळ खट्याक करण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा तिने दिला आहे.
>नालासोपाराही गुजरातमध्ये
नालासोपाºयात एका व्यावसायिकाने नालासोपारा ईस्ट, वसई, गुजरात असा स्पष्ट उल्लेख असलेला फलक लावला आहे. मराठीला तडीपार करतांना महाराष्ट्राऐवजी चक्क गुजरात राज्य लिहून व्यावसायिकांनी गुजरातला महत्व दिल्याने मनसेचे कार्यकर्ते संतापले आहेत.