वसई तालुक्याला अक्षरश: झोडपले; सखल भागात कमरेभर पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:26 PM2019-08-04T23:26:49+5:302019-08-04T23:26:59+5:30

रस्त्यांना नदीनाल्याचे स्वरूप, दुकानांमधील वस्तू भिजल्या

Vasai taluka literally fell | वसई तालुक्याला अक्षरश: झोडपले; सखल भागात कमरेभर पाणी शिरले

वसई तालुक्याला अक्षरश: झोडपले; सखल भागात कमरेभर पाणी शिरले

Next

नालासोपारा : वसई तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ४ ते ५ फूट पाणी शेकडो नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये शिरले आहे. यामुळे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र नदीनाल्याचे स्वरूप आले असून पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विरार येथील बोळींज, फुलपाडा, स्टेशन परिसर, मनवेलपाडा, कारगील नगर तर नालासोपारा येथील नगीनदास पाडा, मोरेंगाव, टाकीपाडा, ओस्तवाल नगर, तुळींज रोड, गाळा नगर, आचोळे रोड, अलकापुरी, संख्येश्वर नगर, डॉन लेन, स्टेशन परिसर, एस टी डेपो रोड, छेडानगर, हनुमाननगर, पाटणकर पार्क, पांचाळनगर, सोपारागाव, उमराळे, नाळा, वाघोली, सनसिटी, गास या परिसरात कमरेच्यावर पावसाचे पाणी साचले आहे.
वसईच्या पूर्वेकडील एव्हरशाईन, गोखिवरे, वालीव, सातीवली, धुमाळनगर, नवघर तर पश्चिमेकडील स्टेशन परिसर आणि अनेक सखल परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी इमारतीमध्ये घुसल्यामुळे विजेच्या मीटरबॉक्समध्ये पाणी गेल्याने महावितरणने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वीज बंद करून ठेवली होती. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठी वाट काढताना कसरत करावी लागत होती. तर वाहन चालकांनाही वाहने चालवण्यास मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही काळाकरिता वसई पूर्व आणि पश्चिम रस्ता बंद झाला होता.

रात्रभर कुठे किती पाऊस पडला
वसई तालुक्यातील मांडवी येथे २६२ मिमी, , आगाशी येथे २३०, निर्मळ येथे २४७, विरार येथे २५२, माणिकपूर येथे १९६, वसई येथे २०२ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरी २३१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

इमारतीच्या गच्चीवर स्थलांतर
शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण वसई तालुक्यात सर्वत्र नदी, नाल्याचे रूप आले आहे. नालासोपारा पश्चिमेकडील अनेक इमारतीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तळमजल्यावर राहणाºया घरात कमरे इतके पावसाचे पाणी घुसल्याने रहिवाशांनी इमारतीच्या गच्चीवर स्थलांतर केले आहे.

थोडासा भाग कोसळल्याने रस्ता बंद....
वसई फाटा येथे रविवारी सकाळच्या सुमारास अतिवृष्टीमुळे गडगापाडा येथील हिरा इंडस्ट्रीजच्या बाजूला असलेल्या डोंगराचा थोडासा भाग कोसळून गडगापाडा येथे जाणारा रस्ता बंद झाला आहे.

छेडा नगर परिसरात पडले झाड
नालासोपारा पश्चिमेकडील छेडानगर परिसरातील मुक्ता, निता आणि गीता अपार्टमेंटच्यासमोर शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड विजेच्या खांबावर पडले. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता संजीव कदम यांनी नगरसेविका सुषमा दिवेकर यांच्याशी संपर्क साधून महावितरणचे वायरमन शिवाजी पाटील आणि अग्निशमन दल यांच्या मदतीने वीजपुरवठा बंद करून पडलेले झाड बाजूला केले.

कर्मचाऱ्यांनी अनेकांचे केले स्थलांतर
अर्नाळा गावातील खारीपाडा येथे शनिवारी रात्री ८ च्या सुमारास समुद्रकिनारी राहणाºया ८८ मच्छिमारांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरीत केले. मध्यरात्री दोनच्या सुमारास राजावली येथील चाळींमध्ये काही जण अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार किरण सुरवसे आणि त्यांच्या इतर अधिकारी, कर्मचाºयांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने ४७ जणांचे स्थलांतर केले. रविवारी मिठागरात राहणाºया नागरिकांचे स्थलांतर केले.

Web Title: Vasai taluka literally fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.