वसई परिवहनचे चालक,वाहक ‘ताडी’ पिऊन चालवतात बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:01 PM2019-06-02T23:01:15+5:302019-06-02T23:01:30+5:30
हा घ्या पुरावा : हजारो प्रवाशांचे जीवन धोक्यात
वसई : महानगरपालिकेच्या परिवहन सेवा बसचे चालक आणि वाहक चक्क ऑनड्युटी ताडीच्या गुत्त्यावर ताडी विकत घेण्यासाठी गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे, विशेष म्हणजे विकत घेतलेल्या ताडीच्या बाटल्या चक्क बसमध्ये घेऊन ते चढले सुध्दा व पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरु वात केली.
शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास एम एच ०४ इ के ११६६. या क्रमांकाची बस नवापूर नाक्यावर थांबली, त्यानंतर ताडी पार्सल घेण्यासाठी बसचे वाहक व चालक दोघेही गणवेशातच नजिकच्या ताडीच्या गुत्त्यावर पोहोचले, त्यांनी तेथून पिण्यासाठी दोन बाटल्या ताडी घेतली आणि ते पुन्हा बसमध्ये परतले, खुले आम रस्त्यावरून चालत पिशवीत ताडीच्या बाटल्या घेऊन ते बसमध्ये चढले, गंभीर म्हणजे बसमध्ये प्रवासी असतांना देखील दोघे चालक व वाहक ताडी केंद्रावर गेले होते.
दरम्यान चालकाला याबाबत विचारणा केली असता प्रथम त्याने ताडी सुट्टी झाल्यांनतर पिणार असल्याचे सांगितले व त्यानंतर सारवासारव करून ताडी वाटेत दुसऱ्याला देणार असल्याचं तो म्हणाला. महापालिकेचे चालक व वाहक मद्यपान करून बस चालवत असल्याचे यापूर्वीच अनेक अपघाती घटनांमुळे समोर आले आहे,
त्यातच नशेत प्रवाशांशी उद्धट बोलणे, शहरी व ग्रामीण भागात बस वेगाने चालविणे, सिग्नल तोडणे आदी अशा अनेक तक्रारी असून महापालिकेने अशा चालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी सोनाली पाटील हिने व्यक्त केले आहे. याबाबत महापालिका परिवहन सभापती प्रितेश पाटील यांना हा सर्व प्रकार सांगितला असता त्यांनी अधिक चौकशी करून या चालक वाहकावर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. वरचेवर घडणाºया या प्रकारामुळे नक्कीच वसई विरार महानगरपालिका अत्र तत्र सर्वत्र बदनाम होते आहे.