वसई परिवहनचा अखेर संप मागे, मागण्या मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:16 AM2020-01-19T00:16:00+5:302020-01-19T00:16:30+5:30
बुधवारी १५ जानेवारीच्या मकरसंक्रांतीपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. या आंदोलनात ७०० च्या वर वाहक आणि चालक सहभागी झाले होते.
- प्रतीक ठाकूर
विरार : वसईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून परिवहन कर्मचाऱ्यांचा सुरू घेतलेला संप अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. पालिकेने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने संप मागे घेत कामगार कामावर परतले आहेत. त्यामुळे शहरातील बससेवा सुरळीत झाली असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी १५ जानेवारीच्या मकरसंक्रांतीपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. या आंदोलनात ७०० च्या वर वाहक आणि चालक सहभागी झाले होते. महापलिका व कर्मचाºयांमध्ये बोलणी होत असून सुद्धा संपाचा तिढा सुटत नव्हता. श्रमजीवी संघटनेचे नेते व वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी वसईच्या डेपोत आंदोलक कामगारांची भेट घेतली. तसेच त्याच संध्याकाळी महापालिकेच्या अधिका-यांची बैठक झाली. यामध्ये भागीदारी ट्रान्सपोर्टचे मालक मनोहर सकपाळ यांनी सद्यपरिस्थितीत खर्चाचा ताण येतोय, त्यामुळे मी परिवहन सेवा चालवू शकत नाही. त्यामुळे ठेकेदाराने प्रकरणावरून हात वर केल्याने संप सुरूच होता.
चौथ्या दिवशी कामगारांनी वसई डेपोत ठिय्या मांडला होता. दरम्यान संध्याकाळी झालेल्या महापालिकेच्या बैठकीत कामगारांच्या चारही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत एकरकमी पगार कर्मचाºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. थकीत भविष्य निर्वाह निधीची रक्कम सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच सोसायटीची १४ लाखांची रक्कम २८ जानेवारीपर्यंत जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या कर्मचाºयांचा महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नसेल त्यांचा भत्ता फेब्रुवारीपर्यंत जमा करण्यात येणार आहे.
कामगारांच्या या सर्व मागण्या मान्य झाल्याने चौथ्या दिवशी संध्याकाळी संप मागे घेतला. सर्व मागण्या मान्य झाल्याने कामगार कामावर परतले असून परिवहन सेवा सुरू झाली आहे. दरम्यान, कामावरून परतण्याच्या वेळी हा संप मिटल्याने कामगारांसह प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्मचा-यांच्या मागे महापालिका सदैव उभी असून त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
- प्रीतेश पाटील, परिवहन सभापती