वसई-विरार अपात्रांच्या हाती
By admin | Published: February 16, 2016 01:47 AM2016-02-16T01:47:42+5:302016-02-16T01:47:42+5:30
आकृतीबंधानुसार पदांवर शैक्षणिक पात्रता असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुका न झाल्याने तीन हजार कोटींचा टप्पा पार पडलेल्या वसई विरार
शशी करपे, वसई
आकृतीबंधानुसार पदांवर शैक्षणिक पात्रता असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुका न झाल्याने तीन हजार कोटींचा टप्पा पार पडलेल्या वसई विरार पालिकेचा कारभार सध्या शैक्षणिक पात्रता नसलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात असून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारीही वारंवार मुदतवाढ घेऊन पालिकेत ठाण मांडून बसले आहेत.
पालिकेत आकृतीबंधानुसार अधिक कर्मचारी असल्याने आयुक्त सतीश लोखंडे यांनी १ फेब्रुवारीपासून २ हजार ८४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमची रजा दिली. सध्या २ हजार ८५७ कर्मचारी आहेत. यातील बाराशे कर्मचारी कायमस्वरुपी असून उर्वरित कर्मचारी ठेका पद्धतीवर आहे. विशेष म्हणजे बाराशे मधील सुमारे साडेचारशे सफाई कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात साडेसातशे अधिकारी-कर्मचारी तीन हजार कोटींचे बजेट असलेल्या पालिकेचे कारभारी आहेत. सध्या पालिकेत अनेक पदे रिक्त आहेत. पहिल्यांदाच सतीश लोखंडे यांच्या रुपाने आयएएस आयुक्त मिळाला. मात्र, नोव्हेंबरपासून अतिरिक्त आयुक्ताचे पद रिक्त आहे. उपायुक्तांची १५ पदे मंजूर असून प्रत्यक्षात दोन उपायुक्त आहेत. सहाय्यक आयुक्तांची ३० पदे मंजूर आहेत, प्रत्यक्षात ९ प्रभाग समित्यां असताना आठ सहाय्यक आयुक्त आहेत. हे आठही पालिकेतील लिपीक असून त्यांना तात्पुरती पदोन्नती देऊन पदावर बसवण्यात आले आहे. याआधी सहाय्यक आयुक्तपदावर नेमलेल्या दोघांना अनधिकृत बांधकामप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तर दोन महिला सहाय्यक आयुक्तांवर गुन्हे दाखल आहेत.