Vasai Virar: मिलिंद मोरे मृत्यू प्रकरण: आरोपीेंना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:54 PM2024-07-30T18:54:40+5:302024-07-30T18:55:14+5:30
Milind More Death Case: नवापूर येथील सेव्हन सी रिसॉर्टमध्ये ठाणे शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांच्या मृत्यूप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा - नवापूर येथील सेव्हन सी रिसॉर्टमध्ये ठाणे शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांच्या मृत्यूप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधा ऐवजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
ठाण्याचे माजी शहरप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र असलेले मिलिंद मोरे हे ठाण्याच्या शिवेसना (उध्दव ठाकरे) गटाचे माजी उपशहरप्रमुख होते. रविवारी ते आपल्या कुटुंबियांसह विरारच्या अर्नाळा-नवापूर येथील सेव्हन सी या रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आले होते. मात्र त्यावेळी एका रिक्षाचालकाशी त्यांचा वाद झाला. यानंतर रिक्षाचालक गावातून आपल्या साथीदारांना घेऊन आला. १५ ते २० जणांनी मिलिंदे मोरे आणि त्यांच्या अन्य नातेवाईकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर काही वेळातच मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या घटनेचे तीव्र पडसाद वसई आणि ठाण्यात उमटले होते. याप्रकरणी रात्री उशीरा अर्नाळा सागरी पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकासह १८ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. नंतर मात्र सोमवारी हत्येचे ३०२ हे कलम लावण्यात आले.
या आरोपींना मंगळवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी मोठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाने आरोपींना ४ ऑगस्टपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणातील आरोपींची नावं पुढीलप्रमाणे आहेत. राहुल घुटूकडे (रिक्षाचालक), ज्ञानेश्वर मेहेर, सचिन मेहेर, मनिष मेहेर, दत्तात्रय मेहेर, रमेश मेहेर, हेमेश मेहेर, कुणाल मेहेर, नारायण मेेहेर, विनायक मेहेर, साहिल तांडेल.