वसई-विरार पालिका हद्दीत वाढला काेराेनाचा धाेका, नागरिकांकडून नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:22 AM2021-03-20T09:22:19+5:302021-03-20T09:22:28+5:30
काेराेनाकाळात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरुण इंडस्ट्रीत एक हजार बेडच्या काेराेना सेंटरचे उद्घाटन करण्यात आले हाेते.
नालासोपारा : वसई-विरारमध्ये काेराेनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत पुन्हा काेराेनाचे रुग्ण वाढत असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आयुक्त गंगाथरन डी. यांनी वसईच्या वालीव येथील बंद केलेले काेविड सेंटर शुक्रवारपासून पुन्हा सुरू केले आहे. या ठिकाणी एक हजार बेडची क्षमता आहे, मात्र सुरुवातीला ५०० बेडचीच सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. १० मार्चपासून महापालिका हद्दीत ५१२ काेराेना रुग्णांची नाेंद झाल्याने पालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
काेराेनाकाळात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरुण इंडस्ट्रीत एक हजार बेडच्या काेराेना सेंटरचे उद्घाटन करण्यात आले हाेते. मात्र, काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले हाेते. या ठिकाणी १६ जानेवारीपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले हाेते. पण, मागील १० दिवसांत वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आयुक्तांनी सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून बंद केलेले या काेविड सेंटरचे दार पुन्हा उघडले आहे. या ठिकाणी महापालिका आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची टीम दिवसरात्र तैनात करण्यात आली आहे.
आतापर्यंत मनपा हद्दीत ३१ हजार १७१ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यातील २९ हजार ६९५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५७४ रुग्ण उपचार घेत असून ९०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
१० मार्चपासून आतापर्यंत ५१२ नवे रुग्ण सापडले असून ३४४ रुग्णांना घरी साेडले आहे, तर दाेन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात काेराेनाची दुसरी लाट सुरू झाल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. तसेच महाराष्ट्रात काेराेनापासून बचावासाठी याेग्य काळजी घेतली जात नसल्याचे ताशेरेही ओढले आहेत. त्याला मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे दुजाेरा मिळत असल्याने राज्यभरात ग्रामीण आणि शहरी भागात विशेष काळजी घेण्याचे आदेश राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना जारी केले आहेत.