वसई-विरार महापालिका निवडणूक : दुसऱ्या लाटेने इच्छुकांच्या आशेवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 09:56 AM2021-03-18T09:56:57+5:302021-03-18T09:57:41+5:30

वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून, २०२० रोजीच संपली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही.

Vasai-Virar Municipal Corporation Election | वसई-विरार महापालिका निवडणूक : दुसऱ्या लाटेने इच्छुकांच्या आशेवर पाणी

वसई-विरार महापालिका निवडणूक : दुसऱ्या लाटेने इच्छुकांच्या आशेवर पाणी

googlenewsNext

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेचा बार एप्रिल महिन्यात उडण्याची शक्यता असतानाच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. निवडणूक लवकरच होईल, या आशेवर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक उमेदवारांची साफ निराशा झाली आहे, तसेच मोर्चेबांधणीसाठी सज्ज असलेल्या राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही निरुत्साहाचे वातावरण आहे.

वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून, २०२० रोजीच संपली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही. पालिकेची मुदत संपून आता ९ महिने पूर्ण होतील. मात्र, अजूनही पालिका निवडणुकीला विलंबाचा सूर लागतच चालला आहे. मध्यंतरी कोरोनाचा आलेख घसरल्यानंतर, पालिका निवडणुकीसंदर्भात पुन्हा एकदा राजकीय मोर्चेबांधणीला जोर वाढला होता. प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर होऊन त्यावरील हरकती व सुनावणीही आता सुरू आहे. 
मात्र, मध्येच कोरोना पुन्हा टपकल्याने निवडणुकीवर पुन्हा संक्रांत ओढावली आहे. 

निवडणुकीसाठी हळदी समारंभ, सामाजिक उपक्रमांना इच्छुक उमेदवारांनी चांगला जोर वाढविला होता. संभावित उमेदवार व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून त्यासाठी मोठा खर्चही  करण्यात आला होता. मात्र, या सर्व खर्चावर कोरोना प्रादुर्भावाने चादर ओढल्याने राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक आणखी काही महिने दूर ढकलली गेली आहे. काही महिन्यांच्या फरकाने राजकीय पक्षांना तयारीसाठी वेळ मिळाला असला, तरी तयारी केलेल्या इच्छुकांची घालमेल मात्र वाढली आहे. 

गावांचा निकाल काय लागणार? 
पुढील ९ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात होत असलेल्या २९ गावांच्या सुनावणीकडे आता वसईकरांचे लक्ष असणार आहे. सलग दोनदा सुनावणी पुढे ढकलून उच्च न्यायालयाने वसईकरांची हुरहूर वाढविली आहे. आता पुढील तारखेला वसई-विरार शहर महानगरपालिकेचा निकाल काय लागतो, त्याकडे वसईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. जोपर्यंत गावांच्या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीवर टांगती तलवार असणार आहे.
 

Web Title: Vasai-Virar Municipal Corporation Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.