वसई-विरार महानगरपालिका निवडणूक लांबणीवर पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 10:08 AM2021-12-12T10:08:58+5:302021-12-12T10:09:18+5:30

ओमायक्रॉनचा धसका : इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा धाकधूक

Vasai Virar Municipal Corporation elections may be postponed omicron variant coronavirus | वसई-विरार महानगरपालिका निवडणूक लांबणीवर पडणार?

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक लांबणीवर पडणार?

Next

नालासोपारा : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या प्रकाराचा धसका सरकारी यंत्रणांनी घेतला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ नये, यासाठी निर्बंध लादण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेची जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेली निवडणूक किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने  सरकारी यंत्रणांनी आढावा घेणे सुरू केले आहे.

मुंबईसह राज्यातील १५ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारीदेखील सुरू केली आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार ही निवडणूक होणार असल्यामुळे प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकांनी आराखडा तयार करण्याची तयारीदेखील सुरू केली आहे. दहा वर्षांच्या काळात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन, सरकारने पालिकेतील नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

नगरसेवकांच्या वाढत्या संख्येनुसार वॉर्डांची रचना करण्याचे कामदेखील केले जात आहे. ही कामे सुरू असतानाच आता ओमायक्रॉन  नावाचा कोरोना संसर्गाचा नवीन प्रकार पुढे आला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने होतो, असेही निरीक्षण नोंदविले जात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी ओमायक्रॉनचा धसका घेतला आहे. आपल्या देशात व राज्यात कोरोनाच्या या नव्या प्रकारचा प्रसार होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले आहेत. निर्बंधही कडक करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिकेची निवडणूकही पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नवीन बाधितांची भर 
वसई-विरार महानगरपालिका हद्दीत पुन्हा कोरोना रुग्ण आढळू लागले असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांमध्येही बेफिकिरी दिसून येत आहे. सध्या मनपा हद्दीत १८५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे मनपाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: Vasai Virar Municipal Corporation elections may be postponed omicron variant coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.