वसई-विरार महापालिकेची मुदत संपायला अवघे ११ दिवस बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:06 AM2020-06-19T00:06:19+5:302020-06-19T00:06:24+5:30
आयुक्त होणार प्रशासक : सत्ताधाऱ्यांमध्ये धाकधूक
विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेची मुदत संपायला अवघे ११ दिवस शिल्लक असून येत्या २८ जून रोजी महापालिका आयुक्त गंगाथरन डी. हे प्रशासकपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. बेधडक निर्णय घेणारे आयुक्त अशी त्यांची अल्पावधीतच वसई-विरारमध्ये ओळख झाल्यानंतर आता प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांची कार्यपद्धती कशी असेल, याबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये धाकधूक असून नागरिकांमध्ये मात्र उत्सुकता आहे.
धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिल्याने गंगाथरन डी. यांना कामाचा चांगला अनुभव आहे. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रामुख्याने वसई-विरार शहर महापालिकेत असलेल्या अनावश्यक खर्चाला त्यांनी कात्री लावली आहे. तसेच सत्ताधाºयांना विश्वासात न घेताच परस्पर निर्णय घेत असल्याने सत्ताधारी आणि आयुक्त यांच्यात आधीच संबंध ताणले गेले आहेत. त्यात प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त सत्ताधाºयांना आणखी कोणता दणका देतात, याचे टेन्शन सत्ताधाºयांना आले आहे.
आणखी किती घोटाळे बाहेर काढणार?
महापालिकेची मुदत २८ जून रोजी संपत आहे. त्यानंतर, प्रशासनाचे सर्व निर्णय हे प्रशासक म्हणून डी. गंगाथरन हे घेणार आहेत. मात्र, निर्णय घेताना त्यांना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागणार आहे. आधीच आयुक्त हे बेधडक निर्णय घेत असल्याने सत्ताधाºयांचा रोष आहे. त्यात प्रशासक म्हणून नियुक्त झाले की, ते कोणते निर्णय घेतात आणि किती घोटाळे बाहेर काढतात, याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.
महासभेबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबितच
महापौर प्रवीण शेट्टी यांनी मध्यंतरी एका निवेदनाद्वारे अंतिम महासभा घेण्याचे आवाहन आयुक्त गंगाथरन यांना केले होते. मात्र, आयुक्तांनी महासभा घेण्यास अद्याप तरी मर्यादा असून योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ, असे सांगून महासभा घेण्यास असमर्थता दाखवली होती. आता महापालिकेची मुदत संपायला ११ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात प्रशासक झाल्यानंतर आयुक्तांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.