वसई विरार महापालिकेच्या परिवहन कामगारांचा संप सुरूच, आजचा सहावा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:26 AM2017-08-20T03:26:12+5:302017-08-20T03:26:12+5:30
वसई : संपकरी कामगार आणि ठेकेदारात बडतर्फीच्या मुद्यावरून वाद असल्याने संपाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आता तर संपकरी कामगार आणि ठेकेदारातील चर्चाच बंद झाली आहे. त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या परिवहन कामगारांचे बेमुदत काम बंद शनिवारीही सुरु होते.
वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. बंदचा आजचा सहावा दिवस असून मध्यंतरी दोनवेळा संप मागेही घेण्यात आला होता. पण, दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मुद्यावरून वाद झाल्याने हा संप सुरु राहिला आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीत आयुक्त सतीश लोखंडे यांनी संपकरी श्रमजीवी कामगार संघटनेचे नेते विवेक पंडित यांना दहा बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांनाही त्याचा पुनरूच्चार केला होता. पण, गुरुवारी रात्री परिवहनचे ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी बडतर्फ कामगारांना चौकशी केल्यानंतर कामगार घेऊ अशी भूमिका घेतली. त्यावरून पुन्हा वाद सुरु झाला. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून कामगार पुन्हा संपावर गेले आहेत.
शुक्रवारी संपकरी कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांनी आयुक्त आणि ठेकेदाराशी चर्चा केली. पण, आयुक्तांनी हात वर करीत ठेकेदारच निर्णय घेईल असे सांगून कामगार बडतर्फीबाबत घुमजाव केले. तर ठेकेदार सकपाळ यांनी चौकशी झाल्यावरच कामगारांना कामावर घेऊ अशी ठाम भूमिका घेतली. परिणामी कोणताच तोडगा न निघाल्याने काम बंद सुरुच राहिले आहे. ठेकेदार आणि कामगार यांच्या या वादात प्रवाशांचे मात्र हाल होत आहे.
संपाशिवाय पर्यायच नाही
आयुक्त सतीश लोखंडे यांनी सर्व मागण्या मान्य करतांना बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. आता त्यांनीच शब्द फिरवल्याने संपाशिवाय पर्याय नाही, असे विवेक पंडित यांनी सांगितले.