वसई-विरार महापालिका घरपट्टी घोटाळा प्रकरण; प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील अखेर निलंबित! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 09:34 PM2023-07-03T21:34:27+5:302023-07-03T21:37:51+5:30

या अपहारास गणेश पाटीलही तेवढेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पालिका आयुक्तांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे.

Vasai-Virar Municipal Housing Scam Case; Assistant Commissioner in charge Ganesh Patil finally suspended | वसई-विरार महापालिका घरपट्टी घोटाळा प्रकरण; प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील अखेर निलंबित! 

वसई-विरार महापालिका घरपट्टी घोटाळा प्रकरण; प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील अखेर निलंबित! 

googlenewsNext

नालासोपारा - मनपातील प्रभाग समिती सी अंतर्गत घरपट्टी विभागात झालेल्या अपहार प्रकरणी प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांनाही अखेर निलंबित करण्यात आले आहे. ९ मार्चपासून गणेश पाटील या विभागात नियंत्रक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे या अपहारास गणेश पाटीलही तेवढेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पालिका आयुक्तांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे.

मनपाच्या प्रभाग समिती सी (चंदनसार) येथे घरपट्टी विभागात करअधीक्षक म्हणून कार्यरत असताना १८ मार्च ते १६ मे २०२३ पर्यंतचा मालमत्ता कर भरणा केलेला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अरुण एल. जानी यांना निलंबित करण्यात आले होते. तर प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

शिवाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी पालिकेचे लेखाधिकारी मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय लेखा परीक्षण पथक गठित करण्यात आले होते. या समितीच्या लेखा अहवालानुसार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी २९ मे रोजी आयुक्तांना अहवाल सादर केलेला आहे. प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांनी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून कार्यरत असताना अधीक्षक अरुण जानी यांनी १८ मार्च ते १६ मे पर्यंत एकूण ७२ लाख ६८ हजार ८९९ रुपये मालमत्ता कर जमा झालेला असताना त्यापैकी केवळ २६ लाख २२ हजार ६६० रुपये इतका भरणा उशिराने म्हणजे १६ मे रोजी केला आहे. उर्वरित रक्कम ४६ लाख ४६ हजार २३९ रुपये इतका भरणा आणखी उशिराने म्हणजे १७ व १८ मे अशा दोन टप्प्यांत केला आहे. या कृत्यास प्रभारी सहाय्यक आयुक्तही तितकेच जबाबदार असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.  

प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांचे हे कृत्य प्रशासकीय शिस्तीस धरून नाही. तसेच हे कृत्य महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नियम ३ चा भंग करणारे व आर्थिक अपहाराचे असल्याने आयुक्त अनिलकुमार पवार यांनी त्यांचे निलंबन केले आहे. विशेष म्हणजे वसईतील पर्यावरण अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी मनपातील घरपट्टी घोटाळा प्रकाशझोतात आणला होता. त्यांच्याच मागणीनुसार, आयुक्तांनी चौकशी समितीची नियुक्ती करून या प्रकरणात दोषी ठरलेल्या प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांचे अखेर निलंबन केले आहे.
 

Web Title: Vasai-Virar Municipal Housing Scam Case; Assistant Commissioner in charge Ganesh Patil finally suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.