वसई-विरार मनपा परिवहन लंगडीच
By admin | Published: October 31, 2015 10:35 PM2015-10-31T22:35:39+5:302015-10-31T22:35:39+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला ३ वर्ष पूर्ण झालीत. परंतु अद्याप तिच्याकडे स्वत:ची आगारे नाहीत. त्यामुळे या सर्व बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला ३ वर्ष पूर्ण झालीत. परंतु अद्याप तिच्याकडे स्वत:ची आगारे नाहीत. त्यामुळे या सर्व बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात. त्यामुळे वसई, नालासोपारा व विरार या तीन्ही रेल्वेस्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. तसेच या बसेस महीनोनमहिने धुतल्या जात नाहीत. अतिशय गलिच्छ अवस्थेत असलेल्या बसेस द्वारे लोकांना ही सेवा देण्यात येते.
महानगरपालिकेने ३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या परिवहन सेवेला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु ती सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन न करण्यात आल्यामुळे आगार, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृहे, बसेस वॉशिंग सिस्टीम व वाहनदुरूस्ती इ. महत्वाच्या यंत्रणा उभ्या राहू शकल्या नाहीत. परिणामी गाड्या धुणे व वाहने पार्क करणे इ. कामे रस्त्यावरच केली जातात. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना बसण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे रस्त्यावर गलिच्छ अवस्थेतील बसेस धावताना पहावयास मिळत आहेत. या सेवेच्या माध्यमातून महानगरपालिका व ठेकेदारांना चांगला महसूल मिळत असतानाही प्रवाशांना सोयीसुविधा देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नव्याने नियुक्त झालेले आयुक्त सतिश लोखंडे यांनी याप्रकरणी लक्ष घालून परिवहन सेवा कशी सुधारेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वसई रोड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेस नवघर परिसरात भर रस्त्यावरच बसेस उभ्या केल्या जात असल्यामुळे संध्याकाळी येथे प्रचंड वाहतुक कोंडी होत असून गोंधळाचे वातावरण निर्माण होत असते.
मध्यंतरी महानगरपालिकेने एस.टी महामंडळाला आपल्या बसेस वळवण्यासाठी त्यांच्या आगाराचा वापर करण्यासंदर्भात चर्चा केली होती. परंतु महामंडळाने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे परिवहन सेवेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मुख्यालय वगळता महानगरपालिका हद्दीत कुठेही ही परिवहन यंत्रणा सक्षम यंत्रणा उभी करू शकली नाही. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलीसांनी याप्रकरणी महानगरपालिकेला २० हुन अधिक प्रस्ताव पाठवले आहेत. परंतु या एकाही प्रस्तावावर महानगरपालिकेने अद्याप विचार केलेला नाही. आम्ही केलेल्या सुचनांची अंमलबजावणी झाल्यास काही प्रमाणात वाहतूक कोंडीवर उपाययोजना होऊ शकते असा वाहतूक पोलीसांचा दावा आहे.