वसई-विरार पालिकेचा कोट्यवधींचा कर थकला; महापालिकेचे ३०० कोटींचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:48 AM2020-02-03T00:48:42+5:302020-02-03T00:49:00+5:30
केवळ १६९ कोटीच वसूल
- आशीष राणे
वसई : दरवर्षी ३०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक करवसुलीचे उद्दिष्ट ठेवून कार्य करणारी महापालिका आणि तिचा करसंकलन विभाग यंदा करवसुलीत मागे पडताना दिसत आहे. किंबहुना पालिकेला आयुक्त व उपायुक्त नसल्याचा हा परिणाम तर नाही ना, अशीही चर्चा पालिका वर्तुळात दबक्या आवाजात ऐकू येत आहे.
आजवर केवळ रु. १६९ कोटीचाच मालमत्ता कर वसुली करण्यात आला असल्याची आकडेवारी महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. उर्वरित रु. १३१ कोटींच्या मालमत्ता करवसुलीसाठी पालिकेकडे चालू आर्थिक वर्षातील केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने मालमत्ता करवसुलीचे काम युद्धपातळीवर अधिक जोमाने करावे लागणार आहे.
पालिकेने यंदाच्या वर्षीही ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असले तरी त्यापैकी केवळ १६९ कोटींची करवसुली करण्यात आली आहे. उर्वरित मालमत्ता करवसुली करण्यासाठी पालिका विविध प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब करून पुढील मालमत्ता कराची वसुली केली जाणार असल्याचे या वेळी पालिकेने स्पष्ट केले आहे.
वसई-विरार भागात छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती, उपाहारगृहे, इमारती, सदनिका, मॉल, शॉपिंग सेंटर्स आदी अशा विविध प्रकारच्या साडेसात लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. यामधील काही मालमत्ताधारकांनी व प्रसिद्ध विकासकांनीही पालिकेचा मालमत्ता कर थकविला आहे. त्यांना रीतसर देयके व नोटिसा काढून मालमत्ता कर वसूल केला जातो.
मात्र तरीही काही मालमत्ताधारक अद्यापही कर भरण्यासाठी पुढे येत नसल्याने त्याचा मोठा परिणाम महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर होतो आहे. यासाठी पालिकेच्या कर संकलन विभागाने आता कंबर कसली आहे. पालिकेने मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा, चौकात करथकबाकीदारांचे नामफलक, नळजोडण्या खंडित करणे आदी उपाय योजले जात आहेत.
करवसुलीसाठी जनजागृती रॅली, चौक सभा!
महापालिकेला मालमत्ता कर भरण्याची ३१ डिसेंबरची मुदत उलटूनही थकबाकीदार कर भरण्यासाठी पुढे येत नसल्याने मालमत्ता करवसुलीसाठी पालिका अधिकारी, कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यातर्फे विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.
च्पालिकेच्या सर्वच नऊ प्रभाग समितीअंतर्गत विभागवार दुचाकीवरून रॅली काढण्यात येत आहे. यात ज्या मालमत्ताधारकांची कराची रक्कम थकीत आहे, त्यांनी लवकरात लवकर मालमत्ता कर व पाणीपट्टीकराचा भरणा करावा, असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
दवंडी पिटून आवाहन : मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी नऊ प्रभागांत पथके नेमण्यात आली असून या पथकांमार्फत कर थकविणाºया मालमत्ताधारकाच्या घरी जाऊन आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी मालमत्ताधारक राहात असलेल्या ठिकाणी दवंडीही पिटवण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्ती, मोठी रक्कम थकीत असलेल्या नागरिकांचे चौकात नामफलक अशा उपाययोजना केल्या जात आहेत.