वसई-विरार बुडाले पाण्यात; पोलिस ठाण्यात पाणीच पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 09:42 AM2023-07-21T09:42:28+5:302023-07-21T09:43:03+5:30
पावसाने झोडपले : तीन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : मागील दोन - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने अक्षरश: झोडपल्याने वसई - विरार आणि नालासोपारा शहर पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे. जिकडे तिकडे पावसाचे कंबरेच्या वर पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने वसईत अनेक नाले बनविण्यापेक्षा नालासोपारा रेल्वेस्थानकाला लागूनच असलेले गटार १२ ते १५ किलोमीटरवरील नायगाव खाडीपर्यंत नेले असते तर दरवर्षी पावसामुळे होणारे नुकसान वाचले असते. पुरामुळे शहराला वेढा बसला नसता, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी अतिमुसळधार पाऊस झाल्याने मुंबई - गुजरात महामार्गावर पावसाचे पाणी येऊन बऱ्याच ठिकाणी वाहतूककोंडी झाली. महामार्ग पोलिस अंमलदार व एनएचएआय पथकाने जेसीबीच्या साहाय्याने नाले रुंद करून व डिव्हायडर फोडून महामार्गावरील पाणी नाल्यात सोडल्याचे आणि वाहतूककोंडी दूर केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी ‘लोकमत’ला दिली.
सनसिटीत प्रवासी अडकले
वसईच्या सनसिटी परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मोठ्या खासगी बसमधून काही प्रवासी प्रवास करीत होते. साचलेल्या पाण्यात ही बस अचानकपणे बंद पडल्याने २० ते २५ प्रवासी अडकले होते. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने जीव सुरक्षा जॅकेट व लाइफ रिंगच्या साहाय्याने त्यांची सुटका केली.
विद्युत पुरवठा बंद
अतिवृष्टी चालू असल्यामुळे बऱ्याच भागात पावसाचे पाणी भरले आहे. महावितरणतर्फे उपाययोजना म्हणून ११ डीटीसीएस, काही फिडर पिलर्स, डिस्ट्रिब्युशन बॉक्सेस बंद केले आहेत. पाऊस कमी झाल्यास तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी दिली.
पोलिस ठाण्यात पाणीच पाणी
पश्चिमेकडील नालासोपारा पोलिस ठाण्याला पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. पोलिस ठाण्याच्या अनेक रूममध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कागदपत्रे भिजली आहेत. तसेच तक्रारदाराला पोलिस ठाण्यात पोहाेचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात गुडघ्याच्या वर पाणी आहे.