वसई-विरारच्या दोन मुलींची 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:16 PM2021-09-15T12:16:47+5:302021-09-15T12:20:17+5:30
मुंबई क्रिकेट संघटनेच्या 19 वर्षाखालील वयाच्या मुलींच्या क्रिकेट संघात वसई विरार मधील या दोघींची अंतिम फेरीतील 20 जणांमधून निवड झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती या दोन्ही मुलींना प्रशिक्षण देणारे क्रिकेट प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी लोकमतला दिली
आशिष राणे
वसई - भारताच्या क्रिकेट संघात मागील काही वर्षा ग्रामीण भागांतून मोठया प्रमाणात क्रिकेटपटू पुढे येऊ लागले आहेत. त्यात आता मुलींनी ही उडी घेतली आहे. नुकतेच अर्नाळा येथील नेस्टर धंबा याची परदेशात ओमानच्या क्रिकेट संघात निवड होऊन त्याला थेट टी- 20 विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळाले असताना, आता वसई तालुक्यातील विरार नंदाखाल गावची झील डिमेलो आणि वसई पूर्वेतील बतूल परेरा या दोन उत्कृष्ट क्रिकेट खेळणाऱ्या मुलींनी आपल्या मेहनतीच्या जिवांवर बाजी मारली आहे.
दरम्यान, नामांकित मुंबई क्रिकेट संघटनेच्या 19 वर्षाखालील वयाच्या मुलींच्या क्रिकेट संघात वसई विरार मधील या दोघींची अंतिम फेरीतील 20 जणांमधून निवड झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती या दोन्ही मुलींना प्रशिक्षण देणारे क्रिकेट प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी लोकमतला दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना पिंगुळकर म्हणाले की,मुंबईचा संघ BCCI मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील साखळी स्पर्धेत या दोन्ही मुली खेळणार आहेत. तर या क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबरपासून गुजरात राज्यातील राजकोटमध्ये खेळवण्यात येणार असून या स्पर्धेसाठी मुंबईच्या संघातून झील डिमेलो आणि बतूल परेरा यांची निवड झाल्यानं वसईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून वसई तालूकाच नव्हे तर पालघर जिल्हावासियासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे
मागील 5 वर्षांपासून सुरू आहे सराव !
झील डिमेलो व बतूल परेरा या दोघीही मागील 5 वर्षांपासून विरारच्या अमेय स्पोर्ट्स अकादमी येथे सराव करत मार्गदर्शन घेत आहेत. तर अमेय स्पोर्ट्स अकादमीच्या गोल्डन स्टार क्रिकेट अँकेडमीमध्ये प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांच्याकडून या दोघी खडतर प्रशिक्षण घेत आहेत. सुरुवातीला ऑफसिझन कॅम्प मध्ये 50 जणांच्या मधून निवड तर आता 20 जणा मधून अशी सलग दुसऱ्यांदा या दोघींची या वयोगटात निवड झाली आहे.
वेगवान व फिरकी गोलंदाजी
विशेष म्हणजे यातील विरारची 16 वर्षाची झील डिमेलो ही उत्कर्ष कॉलेजात शिकत असून ही डावखुरी व वेगवान गोलंदाजी करते. तर वसई पूर्वेस राहणारी 18 वर्षीय बतूल परेरा ही रिजवी कॉलेज ची विद्यार्थी आहे,ती देखील डावखुरी असून ती फिरकी गोलंदाजी करते,
प्रशिक्षक संतोष पिंगुळकर देत आहेत 35 मुलींना मोफत प्रशिक्षण !
लॉकडाउनमध्ये सर्व प्रकारचा सराव बंद करण्यात आला होता. मात्र, जस जसे स्पोर्ट सराव सुरू झाले त्यानंतर आता या दोघी आपल्या सीनियर खेळाडूंबरोबर कसून सराव करत आहेत. तर प्रामुख्याने याठिकाणी यशवंत नगर, विरार येथील भव्य दिव्य अशा मैदानावर माजी महापौर राजीव पाटील यांच्या विशेष सहकार्याने प्रशिक्षक संतोष पिंगुळकर हे अमेय अकॅडमीत येणाऱ्या सुमारे 35 मुलींना अगदीं मोफत प्रशिक्षण देत आहेत आणि त्याचीच ही पोचपावती आहे हे सांगणे वावगे ठरणार नाही.