अखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होणार वसईत !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 12:17 PM2022-02-20T12:17:49+5:302022-02-20T12:17:49+5:30

वसईकरांना दिलासा : तीन मजली इमारत बांधकामाला परवानगी

Vasai will finally have a Sub-Regional Transport Office big relief to people | अखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होणार वसईत !

अखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होणार वसईत !

Next

आशिष राणे

वसई : मागील अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विरार चंदनसार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पालघरला स्थलांतरित न करता ते आता वसई पूर्वेच्या गोखिवरे येथे होणार असल्याचे आदेश १६ फेब्रुवारी २०२२  रोजी राज्याच्या गृह विभागाने काढल्याचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेमके वसईत होणार की पालघर येथे होणार? याबाबत असलेली शंका आता मिटली आहे. गोखिवरे येथे तीन मजली इमारतीच्या १३ कोटींच्या बांधकामालादेखील  परवानगी मिळाली असून या निर्णयामुळे वसईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
पालघर जिल्हा स्थापना होण्यापूर्वी वसई आणि पालघरच्या नागरिकांना आरटीओच्या विविध कामांसाठी ठाण्यातील उपप्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. तर पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर २०१४ नंतर  तात्पुरत्या स्वरुपात विरार पूर्वेच्या चंदनसार येथील भाड्याच्या जागेत हे उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले होते. आता गोखिवरे येथे तीन मजली इमारतही उभारली जाणार असून नागरिकांची कामे लवकर होतील अशी त्यांना अपेक्षा आहे.

१३ कोटी रुपये येणार खर्च
गृह विभागाच्या अवर सचिवांनी गोखिवरे येथील जागेत तळमजला अधिक दोन मजल्याच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या बांधकामाचा एकूण खर्च १३ कोटी रुपये एवढा आहे या जागेत कार्यालयीन इमारत व अद्ययावत वाहने पासिंग व तपासणी प्रमाणपत्र केंद्र तयार केले जाणार आहे.

कुठली कामे होतात आरटीओमध्ये ?
शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नूतनीकरण, अनुज्ञप्तीची दुय्यम प्रत देणे, इत्यादी कामे तसेच वाहन हस्तांतरण, वाहनास ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहन नोंदणी दुय्यम प्रत देणे, कर्जबोजा उतरवणे, चढविणे, प्रमाणपत्र नूतनीकरण व परवानाविषयक कामे या कार्यालयात होतात. या कार्यालयामार्फत दरवर्षी किमान ५० हजारहून अधिक वाहनांची नोंदणी व हजारो वाहनांचे परवाना नूतनीकरण करण्यात येते. 

याअंतर्गत कोणता भाग येतो?
या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत वसई तालुक्यासह पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी आदी भाग येतो. कायमस्वरूपी कार्यालय कुठे असावे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या पालघरमध्ये की वसईमध्ये असावे याबाबत  मतभेद होते.  दुसरीकडे मात्र हे कार्यालय शहरापासून लांब असल्याने वाहनधारकांची आणि नागरिकांची गैरसोय होत होती.

Web Title: Vasai will finally have a Sub-Regional Transport Office big relief to people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.