वसई महिला स्पेशल पुन्हा सुरू, आमदारांचे प्रयत्न सफल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:03 AM2018-12-26T03:03:12+5:302018-12-26T03:03:29+5:30
वसईहून सुटणारी महिला विशेष लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरु झाल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. बहुजन विकास आघाडीने यासाठी पुढाकार घेतला.
विरार : वसईहून सुटणारी महिला विशेष लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरु झाल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. बहुजन विकास आघाडीने यासाठी पुढाकार घेतला. रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी ही लोकल पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र ती सुरु होण्याचे श्रेय घेण्याची चढाओढही सुरु झाली होती.
सहा महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेली महिला विशेष लोकल १ नोव्हेंबरला बंद करण्यात आली होती. वसई नायगाव मधील महिलांना ही लोकल सोयीस्कर असल्यामुळे व यामुळे त्यांना आरामात प्रवास करता यावा यासाठी महिलांकडून लोकलची पुन्हा मागणी केली गेली होती. हि लोकल २५डिसेंबरला सकाळी सुरु करण्यात आली. यावेळी बीजेपी कार्यकर्त्यांनी लोकलवर पक्षाचा बॅनर लावून ‘‘जय हिंद’’, ‘‘नारी शक्ती झिंदाबाद’’, इत्यादी घोषणा दिल्या. मीरा भार्इंदर मध्ये देखील अशीच चडाओढ पाहायला मिळाली. ९.०६ची महिला विशेष लोकल 1 आॅक्टोबर पासून विरार हून सोडण्यात येत आली असल्याने, मीरा-भायंदर इथल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली. त्यासाठी शिवसेनेचे राजन विचारे यांनी प्रयत्न केले होते दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतल्या व लोकल आमच्याच प्रयत्नांनी सुरु झाल्याचे दावे केले. २५ डिसेंबर पासून मीरा-भायंदर इथून देखील ९.०६ ची लोकल पुन्हा सुरु करण्यात आली. यात राजकीय पक्षांची स्पर्धा सर्वत्र पाह्यला मिळाली.
सामाजिक कार्य पेक्षा हे राजकीय कार्य जास्त होते असे दिसून आले. ९.०६ च्या महिला विशेषचे श्रेय शिवसेनेने घेतले. दोन्ही लोकल चा फायदा उकलण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांत चढाओढ दिसून आली.
सामाजिक कार्य करत असताना ते शांतपणे व्हावे अशी म्हण असली तरी याठिकाणी महिलांना मदत केल्या नंतर त्याचा गाजावाजा करण्यात आला. भार्इंदर लोकलचे उद्घाटन खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. राजकीय पक्ष स्वत:चे श्रेय घेताना दिसत होते.
महिलांसाठी हि लोकल पुन्हा सुरु केली ही कौतुकाची बाब असली तरी मूळात ती रद्द होऊ दिलीच कशाला या प्रश्नाचे उत्तर मात्र एकाही राजकीय पक्षाकडे आज नव्हते.
हि लोकल सुरु होण्याचे श्रेय कोणीही घेत असले तरीही, प्रत्यक्षात युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी रेल्वे मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हि लोकल सुरु करण्याची मागणी केली होती आणि त्याला मंत्र्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला.
- आजीव पाटील,
संघटक, बहुजन विकास आघाडी