वसईत चेनचोरांचा सर्वत्र झाला सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:21 PM2019-05-02T23:21:32+5:302019-05-02T23:22:07+5:30
पोलीस ढिम्म : सीसीटीव्हीचा दरारा नाहीच
नालासोपारा : वसई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून चेन चोरांचा सुळसुळाट झाला असून मोटार सायकलवर आलेले चोरटे लाखों रु पये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने खेचून पळून जात आहे. या चेन चोरांवर अंकुश लावण्यात पालघर पोलीस अपयशी ठरले असून या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. चेन चोरांच्या दहशतीमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. विरार, नालासोपारा आणि तुळींज या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याचे गळ्यातील दागिने खेचून नेल्याचे गुन्हे दाखल केले असून तपास करत आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील सेंट फ्रान्सिस शाळेसमोरील गोपाल कृष्ण कुंज इमारतीमध्ये रूम नंबर २०४ मध्ये राहणाऱ्या सुलोचना सदानंद गादीकर (६४) ह्या शनिवारी संध्याकाळी पूर्वेकडील तुळींज रोडच्या साईदत्त मंदिरात संत्संगाला गेल्या होत्या त्या रात्री पावणे दहाच्या सुमारास पाटणकर पार्क रोडवरून पायी घरी जात असतांना सेंट फ्रान्सिस शाळेच्याजवळ आल्यावर समोरून वेगाने मोटार सायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गादीकर यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रु पये किंमतीचे सहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ३५ हजार रुपयांची १२ ग्रॅम सोन्याची चेन आणि ७५ हजार रुपयांचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे छोटे मंगळसूत्र असा एकूण २ लाख ९० हजार रु पयांचे दागिने खेचून पळून गेले.
मंगळसूत्र पळविले
विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील विकास नगरी -२ मधील श्री मंगलम अपार्टमेंटमध्ये रूम नंबर २०६ मध्ये राहणाºया तनुजा राजेंद्र ताकटे (३५) ह्या शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी घराबाहेर निघाल्या. फुलपाडा रोडवर पायी चालत असताना पाठीमागून मोटार सायकलवरून आलेल्या एका चोरट्याने तनुजा यांच्या गळ्यातील ४५ हजार रु पये किंमतीचे १५ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले आहे.