वसईत मॅनहोलमध्ये मुलगा पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 02:00 AM2019-04-18T02:00:53+5:302019-04-18T02:01:07+5:30
मंगळवारी सकाळी चिमाजी आप्पा मैदानावर आपल्या आईसोबत क्रिकेटच्या मैदानावर सरावासाठी जात असलेल्या एक लहान मुलगा गटारावरील मॅनहोलमध्ये पडला.
वसई : मंगळवारी सकाळी चिमाजी आप्पा मैदानावर आपल्या आईसोबत क्रिकेटच्या मैदानावर सरावासाठी जात असलेल्या एक लहान मुलगा गटारावरील मॅनहोलमध्ये पडला. सुदैवाने नागरिकांनी प्रसंगावधान राखून लगेच त्या मुलाला बाहेर काढले. या घटनेनंतर पालिकेतील ठेकेदारांचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाटावर आला आहे. तर स्थानिक नगरसेविकेने चोरट्यांनी झाकणे सरकवल्यामुळे अपघात घडल्याचा दावा केला आहे.
महानगर पालिकेतील ठेकेदार व अधिका-यांच्या लागेबांध्यामुळे शहरात होणारी विकासकामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. या कामाचा फटका मात्र आता सर्वसामान्य लोकांना बसत आहे. वसई पश्चिमेतील चिमाजी आप्पा मैदानाजवळील ६० फुटी रस्त्यालगत बांधलेल्या नाल्यावरील गटाराचे कामही असेच दर्जाहीन आहे. मंगळवारी सकाळी गटारावरील झाकण सरकून एक लहान मुलगा थेट गटारात कोसळला. सुदैवाने त्यावेळी तेथे उपस्थित असलेले नवघर-माणिकपूर शहरप्रमुख राजाराम बाबर यांनी इतर लोकांची मदत घेऊन त्या मुलाला गटारातून सुखरूप बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला.
वसई येथील नरवीर चिमाजी आप्पा मैदानालगत नाल्यावर मनपाकडून गटार बांधण्यात आले आहे. या गटाराचे काम निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या असतांना, गटारावरील लोखंडी झाकणेही काळजीपूर्वक बसवलेली नाहीत. मंगळवारी सकाळी ६.३० वाजता अतुल्य पेडणकर (वय १०) हा मुलगा आपल्या आईसोबत मैदानावर क्रिकेटच्या सरावासाठी जात होता. गटारावरील लोखंडी झाकणावर त्याचा पाय पडताच तो थेट गटारात कोसळला. घाबरलेल्या त्याच्या आईने जोरजोराने आरडाओरडा करून मदतीसाठी लोकांना बोलावले. या दरम्यान शहरप्रमूख राजाराम बाबर आपल्या मुलाला मैदानावर सरावासाठी घेऊन आले होते.त्यांनी प्रसंगावधान राखून गटारात पडलेल्या अतुल्यला त्वरीत बाहेर काढले. त्याला किरकोळ दुखापत झाली असून, हॉस्पीटलमध्ये उपचार करून त्याला घरी पाठविण्यात आले. अतुल्यच्या आईला मात्र या घटनेनंतर मोठा धक्का बसला होता. मुलाला सुखरूप बाहेर काढल्यानंतरही त्या बराच वेळ सावरल्या नव्हत्या. ठेकेदाराचे निकृष्ट काम, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा कामाकडे कानाडोळा यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप राजाराम बाबर यांनी केला असून, संबंधीत अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका विद्या पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाल्यावरील गटाराचे काम पाच वर्षापूर्वी झाले असल्याचे सांगीतले.