वसईत वाहतूक पोलिसाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:26 AM2017-08-11T05:26:56+5:302017-08-11T05:26:56+5:30

ट्रिपल सीट असलेल्या एका दुचाकीस्वाराने सिग्नल तोडल्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार नवघर-माणिकपूर शहरात घडला.

 Vasaiet Traffic Police Strike | वसईत वाहतूक पोलिसाला मारहाण

वसईत वाहतूक पोलिसाला मारहाण

Next

वसई : ट्रिपल सीट असलेल्या एका दुचाकीस्वाराने सिग्नल तोडल्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार नवघर-माणिकपूर शहरात घडला. धक्कादायक बाब म्हणजे या दुचाकीस्वाराविरोधात फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नवघर-माणिकपूर शहरात पार्वती क्रॉस सिग्नलजवळ हा प्रकार घडला. पत्नी आणि मुलाला घेऊन जाणाºया सोहेल मेमनने सिग्लन तोडला. त्यामुळे वाहतूक पोलीस काळू मुंडे यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. गाडी न थांबवता तो मुंडे यांनाच दमदाटी करू लागला. ते समोर आले असता दुचाकी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्नही त्याने केला. ते गाडी समोरून हटत नव्हते. त्यांनी त्याला दंड भरण्याचा आदेश दिला असता संतापलेल्या मेनन यांनी गाडी थांबवून अश्लिल शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. माझे काय वाकडे करायचे आहे ते कर, मी कुणाला घाबरत नाही, असे आव्हान देवून तो पसारही झाला. विशेष म्हणजे भरचौकात हे घडले तरी कुणीही मेनन याला रोखले नाही.
याप्रकरणी मुंडे यांच्या तक्रारीनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना मारहाण होत असल्याची व्हिडीओ क्लीपही व्हायरल झाली असतांना पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, वसई विरार परिसरात सिग्नल बसवण्यात आले असले तरी त्याचे पालन वाहन चालक करताना दिसत नाही. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या कमी झालेली नाही. उलट मे महिन्यात विरार पश्चिमेला विवा कॉलेज चौकात बसवण्यात आलेला सिग्नलच काढून टाकण्यात आला आहे.

Web Title:  Vasaiet Traffic Police Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.