वसईत जमावाचा पालिका, पोलीस अधिका-यांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:47 AM2018-02-23T06:47:24+5:302018-02-23T06:47:28+5:30
बेकायदा चाळी तोडण्यासाठी राजीवली येथे गेलेल्या वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर सुमारे चारशे लोकांच्या जमावाने तुफानी दगडफेक करून हल्ला केला
वसई : बेकायदा चाळी तोडण्यासाठी राजीवली येथे गेलेल्या वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर सुमारे चारशे लोकांच्या जमावाने तुफानी दगडफेक करून हल्ला केला. त्यांनी महापालिकेचा जेसीबी, कार आणि मोटारसायकली पेटवल्या. यात पालिकेचे काही अधिकारी आणि पोलीस जखमी झाले आहेत. रात्री पोलिसांनी वीस हल्लेखोरांना अटक केली आहे.
या परिसरात आदिवासी आणि वनखात्याच्या जागेवर बेकायदा चाळी बांधल्या आहेत. त्या तोडण्यासाठी महापालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह ५० कर्मचारी गुरुवारी सकाळी गेले होते. सोबत ३५ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पालिकेचे २० सुरक्षा रक्षकही होते. एक पोकलेन मशीन, तीन जेसीबींच्या साहाय्याने तीनशे खोल्या पाडण्यात आल्या. यामुळे संध्याकाळी ५नंतर चाळ माफिया व रहिवासी हिंस्त्र झाले. त्यांनी येथे राहणाºया लोकांना चिथवले. त्यामुळे सव्वापाचच्या सुमारास चारशे महिला - पुरुषांच्या जमावाने महापालिकेच्या पथकावर तुफान दगडफेक केली. यामुळे महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि पोलिसांची पळापळ झाली. जमावाने दगडफेक करीत त्यांचा पाठलाग करून त्यांना कारवाईपासून रोखले. परिस्थिती पाहता जादा पोलीस कुमक मागवण्यात आल्यानंतर पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करून हल्लेखोरांना पिटाळून लावले. रात्री उशिरापर्यंत वीस हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. उद्यापासून पुन्हा कारवाई सुरू ठेवण्यात येणार असून हल्लेखोरांना अटक करण्याचे सत्र पोलीस सुरू ठेवणार आहेत.
जमावाने महापालिकेच्या जेसीबीसह एक कार आणि काही मोटारसायकलीं पेटवून दिल्या. पोलिसांच्या गाड्यांचीही नासधूस केली. या हल्ल्यात महापालिका अधिकारी कर्मचाºयांसह काही पोलीसही किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी २० हल्लेखोरांना अटक केली आहे.