लष्करी सेवेत वसईचा अटकेपार झेंडा, भुईगावचे सुपुत्र माल्कम डायस यांची ‘फ्लाइट लेफ्टनंट’पदी बढती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 01:34 AM2020-01-05T01:34:44+5:302020-01-05T06:48:01+5:30
लष्करातले शौर्य, तिथला रुबाब त्याला सतत खुणावत होता आणि तेच स्वप्न साकार करण्यासाठी झेपावलेल्या माल्कमचे नाव आधी ‘एनडीए’ प्रशिक्षणादरम्यान झळकले होते.
आशीष राणे
वसई : लष्करातले शौर्य, तिथला रुबाब त्याला सतत खुणावत होता आणि तेच स्वप्न साकार करण्यासाठी झेपावलेल्या माल्कमचे नाव आधी ‘एनडीए’ प्रशिक्षणादरम्यान झळकले होते. परंतु आता वसईच्या भुईगावस्थित माल्कम डायस या तरुणाची भारतीय वायू दलात ‘फ्लाईट लेफ्टनंट’पदी बढती झाली आहे. यापूर्वी झालेल्या ‘एनडीए’च्या प्रशिक्षणासाठी देशभरातल्या चार लाख तरुणांमधून निवडलेल्या ४४९ जणांमध्ये माल्कम झळकला होताच. त्यामुळे लष्करी सेवेत इतक्या मोठ्या पदंवर पोहचलेला माल्कम हा पहिलाच वसईकर सुपुत्र ठरला असून त्याच्या या अविरत यशामुळे वसईत सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
माल्कम सामान्य कुटुंबातील आहे. अगदी प्राथमिक शिक्षण वसईच्या सेंट अॅन्थनी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घेऊन त्यानंतर त्याने १२ वीपर्यंतचे उच्च माध्यमिक शिक्षण पापडीच्या थॉमस बाप्टिस्त ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले. बारावीपर्यंत शिकलेला माल्कम डायस हा सुरुवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचित होता. मात्र, आश्चर्य म्हणजे त्यास डॉक्टर-इंजिनीअर वगैरे होण्याचे वेध त्याला कधीच लागले नाहीत. त्याला लहानपणापासूनच लष्करी सेवेचे आकर्षण राहिले होते. त्यामुळे २०१३ मध्ये त्याने पुण्याची एनडीए अकादमीत प्रवेश घेतला. एनडीएतील प्रशिक्षणासाठी देशातील चार लाख तरुणांमधून निवडलेल्या ४४९ मध्ये माल्कम झळकला होता. पुढे तीन वर्षे खडतर सैनिकी प्रशिक्षणानंतर २०१६ मध्ये माल्कम भारतीय लष्करात मानाच्या पदावर म्हणजेच भारतीय वायू दलाच्या ‘फ्लार्इंग आॅफिसर’पदी रुजू झाला.
भारतीय लष्कर सोडाच, साध्या सरकारी नोकरीचे सुद्धा वसईकरांना अप्रूप नाही. गावातली शेती आणि जवळपासच्या नोकरी-धंद्यात समाधानी राहण्याचा त्यांचा पिंड. मात्र, ही परंपरा मोडीत काढून माल्कमने थेट भारतीय लष्करी सेवेत वसईचा झेंडा अटकेपार रोवून तो आज डौलाने फडकवला आहे. तर यापूर्वी प्रथम एनडीए, नंतर फ्लाईट आॅफिसर व आता फ्लाईट लेफ्टनंट पदावर काम करणारा माल्कम हा वसईचा पहिलाच जवान ठरला आहे.
माल्कमचे वडील एलायस डायस हे एका शाळेत लॅब असिस्टंट म्हणून निवृत्त झाले असून आई टेलरिंग काम करते. घरच्यासोबतच आग्रा येथे राहणाऱ्या काकांनी प्रोत्साहन दिल्यानंतर माल्कम डायसने एप्रिल २०१३ मध्ये सीडीएसची लेखी परीक्षा दिली. देशभरातल्या चार लाख तरुणांमधून फक्त ८ हजार ५०० जण त्यात उत्तीर्ण झाले. माल्कम त्यापैकी एक होता. दरम्यान, माल्कम यास १६ डिसेंबर २०१९ रोजी फ्लाईट लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली आहे.
>स्वप्न सत्यात उतरले
वसईच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर वसलेल्या भुईगाव गावातील ते साधे पत्र्याचे घर... वडील शाळेत लॅब असिस्टंट म्हणून निवृत्त तर आईच्या हाती टेलरिंग व घरातलेच काम. खरे तर प्रत्येक कुटुंबातील आई-वडिलांना वाटते की, घरची परिस्थिती कशीही असो, माझ्या मुलाने खूप शिकावे, मोठे व्हावे, चांगली नोकरी, धंदा करून सुखी व्हावे, निदान आमच्या ‘म्हातारपणाची काठी’ तरी व्हावे, एवढीच त्या आई-वडिलांची प्रत्येक मुला-मुलीकडून अगदी माफक अपेक्षा असते. मात्र त्या पलीकडे गेलेल्या जिद्दी माल्कम याची स्वप्ने फार मोठी आहेत... बघता बघता ती आज सत्यात उतरली आहेत.