वसईत टँकरलॉबी पुरवते दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 04:45 PM2017-07-26T16:45:47+5:302017-07-26T16:45:47+5:30
शहरात पाणीटंचाईचा फायदा उठवत टँकरलॉबी शहरात दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळू लागली आहे.
वसई, दि. 26 - शहरात पाणीटंचाईचा फायदा उठवत टँकरलॉबी शहरात दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळू लागली आहे. वसई-विरार शहरातील अनेक भागात पाणीटंचाई आहे. त्यामुळे टँकरचे पाणी प्यावे लागत आहे. पण टँकरवाले दूरवरून पिण्याचे पाणी आणण्याऐवजी गोखिवरे येथील एका डबक्यात साचलेले पाणी लोकांना विकू लागले आहेत.
येथील एका डबक्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्याठिकाणी पाच मोटरपंप बसवण्यात आले आहेत. त्यातून दिवसरात्र टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. हेच पाणी शहरात पिण्यासाठी म्हणून एक ते दीड हजार रुपये प्रति टँकर या दराने विकले जात आहे. दिवसरात्र सध्या सुमारे दोनशेहून अधिक टँकर पाणी भरले जात आहे.
डबक्यातील पाणी अस्वच्छ, दूषित आहे. त्यामुळे ते पिण्यास आणि वापरण्यासही आरोग्यासाठी घातक आहे. पण त्याची पर्वा न करता टँकरलॉबी आर्थिक लाभपोटी लोकांच्या जीवाशी खेळत आहे.