वसईत क्लिनअप मार्शल फेल
By admin | Published: August 11, 2015 11:35 PM2015-08-11T23:35:16+5:302015-08-11T23:35:16+5:30
महानगरपालिका हद्दीमध्ये क्लिनअप मार्शल तैनात करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आला आहे. या माध्यमातून स्वच्छतेबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे स्पष्ट
वसई : महानगरपालिका हद्दीमध्ये क्लिनअप मार्शल तैनात करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आला आहे. या माध्यमातून स्वच्छतेबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दंड आकारण्याऐवजी मार्शल स्वत:चे खिसे भरू लागल्याचे प्रथमदर्शनी आढळल्यामुळे ही योजना राबवायची की नाही असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
वर्षापूर्वी महानगरपालिकेने आपल्या हद्दीत थुंकणाऱ्या नागरीकांना रोखण्यासाठी क्लिनअप मार्शल योजना अंमलात आणली. ही योजना गेले वर्षभर एका ठेकेदाराच्या माध्यमातुन राबवण्यात येत आहे. परंतु त्याचा अपेक्षीत परिणाम न जाणवल्यामुळे ही योजना चालू ठेवायची की नाही अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या योजनेला अनेक नगरसेवकांचाही विरोध आहे. हे क्लिनअप मार्शल वेळप्रसंगी नागरीकांशी हाणामाऱ्या करतात त्यामुळे या योजनेबाबत नागरीकांमध्ये प्रचंड संताप आहे. दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी हे क्लिनअप मार्शल अनेकदा बळाचा वापर करीत असतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात वाद-विवाद व हाणामाऱ्याच्या अनेक घटना घडल्या.
एवढे सारे होऊनही हद्दीतील स्वच्छतेचे तीनतेराच वाजले असल्यामुळे ही योजनाच गुंडाळण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे. यापूर्वी अनेक नगरसेवकांनी या योजनेचा विपरीत परिणाम होत असल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. (प्रतिनिधी)