वसईकरांना वैद्यकीय सेवा मिळणार विनामूल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:28 PM2019-01-03T23:28:43+5:302019-01-03T23:28:52+5:30
वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्वच वैद्यकीय सेवा नवीन वर्षात आता विनामूल्य दिल्या जाणार आहेत.
वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्वच वैद्यकीय सेवा नवीन वर्षात आता विनामूल्य दिल्या जाणार आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या औषधापासून शस्त्रक्रियेचा खर्च महानगरपालिकेतर्फे उचलला जाणार आहे. माजी महापौर प्रविणा ठाकूर यांनी याबाबत सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा महापालिकेकडून विनामूल्य उपलब्ध व्हावी म्हणून पाठपुरावा केला होता.
सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आस्थापना वगळता ३६ कोटी रु पयांची वार्षिक तरतूद आहे, तर आरोग्य विभागासाठी २० कोटी रु पये खर्च होत असतो. बाह्यÞ रु ग्णांकडून महापालिकेला दोन कोटी रु पयांचे उत्पन्न मिळते. आरोग्य सेवा मोफत केल्याने महानगरपालिकेवर तीन पटीने आर्थिक भार पडणार आहे.
महापालिकेकडे २१ आरोग्य केंद्रे असून त्यात वाढ केली जाणार आहे. १५ आरोग्य केंद्रे वाढवली जाणार आहे. १०० खांटांचे ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. पालिकेकडे सध्या जूचंद्र (नायगाव), सातिवली (वसई) आणि सर्वोदय नगर (नालासोपारा) येथे तीन माता बालसंगोपन केंद्रे असून त्यात महिलांची विनामूल्य प्रसूती केली जाते. विरारच्या नारिंगी आणि नाळा येथे आणखी दोन माता बालसंगोपन केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
याबाबत प्रविणा ठाकूर यांनी सांगितले की, महापौर पदावर असताना वैद्यकीय सहाय्यतेसाठी अनेक लोक मदतीसाठी येत होते. त्यामुळे वैद्यकीय सेवा घेण्यास ज्या लोकांनी आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विनामूल्य उपचारकरता येईल का असा विचार समोर आला होता. याबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. माता बाल संगोपन केंद्र सद्या वसईत तीन आहेत. त्यांची संख्या आणखीन दोनने वाढविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखीन गरज असल्यास त्याचा विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
वसई विरार महानगरपालिकेकडे सध्या दोन रुग्णालये, तीन माता बालसंगोपन केंद्रे व २१ आरोग्य केंद्रे आहेत. या रु ग्णालयात दररोज हजारो रुग्ण तपासणीसाठी तसेच उपचारांसाठी दाखल होत असतात. त्यांच्या विविध तपासण्या, शस्त्रक्रीया केल्या जातात. महानगरपालिकेकडून काही औषधांचा पुरवठाही केला जातो, तर काही औषधे बाहेरून आणण्यासाठी लिहून दिली जातात. मात्र, अनेक रुग्णांना रुग्णालयातून बाहेर गेल्यानंतरही औषधांचा भार सहन करावा लागतो, तसेच वारंवार रुग्णालयात यावे लागते. या रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना तर औषधांसाठी वारंवार यावे लागते. अनेकांना डायलिसीस करून घ्यावे लागते. तात्कालीन महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या लक्षात या बाबी आल्यानंतर त्यांनी आरोग्य सेवा मोफत कशी करता येईल यासाठी पालिका प्रशासनापुढे पाठपुरावा केला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका आता दंकचिकित्सेपासून अनेक शस्त्रक्रीया आणि चाचण्या मोफत करणार आहे. एकदा रु ग्ण उपचारासाठी दाखल झाला की त्याचा सर्व खर्च पालिका करणार आहे, तसेच नंतरही त्याला लागणारा सर्व उपचार मोफत केला जाणार आहे.
गरीब ,गरजू लोक पैशाअभावी वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.पालिकेच्या या निर्णयाचे निश्चितच सर्व स्तरातून स्वागत होईल.
- प्रविणा हितेंद्र ठाकूर,
माजी महापौर
वैद्यकीय सेवेसाठी एखादा रु ग्ण आल्यास त्याचा संपूर्ण खर्च पालिकेकडून विनामूल्य केला जाणार आहे. मोफत उपचार, औषधे व उत्तम दर्जाची आरोग्य सेवा महानगरपालिका पुरवणार आहे.
- सतीश लोखंडे, आयुक्त,
वसई-विरार महानगरपालिका