वसईकरांना मिळणार अधिक दर्जेदार वीज पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 09:00 PM2018-06-19T21:00:17+5:302018-06-19T21:00:17+5:30
'ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देण्यास बांधील असनाऱ्या महावितरणने वसई तालुक्यातील वीज यंत्रणा अद्यावत करण्याच्या दृष्टीने विविध कामे हातात घेतली आहेत
वसई - 'ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देण्यास बांधील असनाऱ्या महावितरणने वसई तालुक्यातील वीज यंत्रणा अद्यावत करण्याच्या दृष्टीने विविध कामे हातात घेतली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत कंत्राटदारांना ही कामे पुढील तीन महिन्यात पूर्ण करण्याचे सक्त आदेश कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी दिले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेवर वाढत्या ग्राहक संख्येमुळे बऱ्याच वेळा ताण येऊन यंत्रणेत बिघाड होतो. यामुळे ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात व्यत्यय येतो तसेच महावितरणचेही आर्थिक नुकसान होते. या बाबी लक्षात घेऊन कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता रफिक शेख यांनी वसई करता तीन महिन्याचा अॅक्शन प्लान तयार केला आहे. याकरता दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना(डीडीयुजीजेवाय) व एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प(आयपीडीएस) या योजनांमधून विविध कामे केली जाणार आहेत. या कामाचा लाभ वसई विभागातील सुमारे ३लाख ग्राहकांना होणार आहे.
कामन परिसर - सहा नवीन वीज वाहिण्या
महावितरणमार्फत कामन परिसरास विना व्यत्यय वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने पोमन स्विचिंग स्टेशन(ता.वसई) येथून नवीन सहा नवीन वीज वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या सहा नवीन वीज वाहिन्याद्वारे कामन परिसरातील एकूण चार वेगवेगळ्या भागात वीज पुरवठा करण्यात येणार आहे. हे काम दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. सध्या कामन परिसराचा वीज पुरवठा कामन फिडर व बापाने फिडर यावरून होतो. कामन फिडरचा पुरवठा हा ५० किमी लांब असलेल्या अग्रवाल स्विचिंग स्टेशन मधून येतो. या स्विचिंग स्टेशनवर ३६०अॅम्पीयरचा भार आहे. तर बापाने फिडरचा पुरवठा हा ३५ किमी लांब असलेल्या जुचंद्रा स्विचिंग स्टेशन मधून येतो. या स्विचिंग स्टेशनवर १८०अॅम्पीयरचा भार आहे.
या कामाचा लाभ पोमन औद्योगिक वसाहत, कामन, कोल्ही, खिंडीपाडा, बापाने, चिंचोटी गाव, देवदल सागपाडा, आयेशा कंपाऊंड, पटेल इंडस्ट्रीयल इस्टेट, शिलोत्तर, नागळे, महाजनपाडा, डोंगरीपाडा, मोरी, पोमन, भेंडीपाडा, कामन रेल्वे स्टेशन, बेबीपाडा गाव इत्यादी परिसरास होणार आहे.
वसई गाव परिसर - सहा नवीन वीज वाहिण्या
वसई गाव परिसरास महावितरणच्या फिडर क्रमांक ३ व फिडर क्रमांक ६ वरून होतो. सध्या फिडर क्रमांक तीन व सहाला सुमारे पाच ते साडेपाच किमी. लांब असलेल्या वसई येथील महापारेषणच्या उपकेंद्रातून पुरवठा होतो. या केंद्रावर ४२० अॅम्पीयरचा भार आहे. महावितरणमार्फत वसई गाव परिसरास विना व्यत्यय वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने वसईगाव स्विचिंग स्टेशन(पारनाका)(ता.वसई) येथून नवीन सहा नवीन वीज वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. हे काम एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प(आयपीडीएस) या योजनेमधून केले जाणार आहे. या सहा केबल टाकल्यामुळे फिडर क्रमांक ३ व फिडर क्रमांक ६ वरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे. याचबरोबर या सहा केबलचा फायदा वसई फिडरलाही होणार असून या फिडर वरील २४० अॅम्पीयरचा भार कमी होणार आहे.
या कामामुळे पापडी, सागरशेत, तामतलाव परिसर, रमेडी, भास्कर आळी, हत्तीमोहल्ला परिसर, पाचूबंदर, लांगीबंदर, किल्लाबंदर, कोळीवाडा परिसर, वसई कोर्ट परिसर आदी भागास विना व्यत्यय वीज पुरवठा देणे शक्य होणार आहे.