वसईत पोलिसांच्या जाचाला कंटाळून दांपत्याचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:47 PM2018-06-24T23:47:52+5:302018-06-24T23:47:55+5:30
वसईत पोलिसांच्या जाचाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याचा विषय चर्चेत असतानाच आता या प्रकरणात आरोपी असणाऱ्या पोलिसांवर कारवाई नाही झाली
विरार : वसईत पोलिसांच्या जाचाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याचा विषय चर्चेत असतानाच आता या प्रकरणात आरोपी असणाऱ्या पोलिसांवर कारवाई नाही झाली तर, आई वडिलांनी देखील सामुहिक आत्मदहनाचा इशारा पोलिस अधीक्षकांना दिला आहे.
आपल्या दोन्ही मुलांच्या आत्महत्ये प्रकरणी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक आणि डीवायएसपी देखील तितकेच जबाबदार असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप देखील वडील विनय झा यांनी केला आहे. ज्या पोलिसांना आरोपीचा पिंजºयात उभे केले त्यांची चौकशी पोलिसच करत असल्याने आपल्याला न्याय कसा मिळणार? अशी व्यथा वजा अविश्वास त्यांनी बोलून दाखविला असून, आपल्याला जर लवकर न्याय मिळाला नाही तर कुटुंबासहित सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा विनय झा यांनी दिला आहे. या सर्व प्रकरणी विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यासह आणखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात पालघर चे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी झा बंधूंच्या वडिलांनी केली आहे.
पोलिसांनी दोन्हीं भावांना खोट्या गुह्यात अडकवून त्यांचा छळ मांडला होता. विकास झा याने ९ नोव्हेंबर २०१७ रोजी डीवायएसपी यांच्या कार्यालयात जाऊन स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
मृत विकास झा ला न्याय मिळण्यासाठी त्याचा भाऊ अमित झा हा कायदेशीर प्रयत्न करत होता. परंतु त्याला देखील न्याय मिळण्यापासून रोखले जात होते. अमितच्या वाटेला देखील नैराश्या येत होते. २० जानेवारी २०१८ रोजी अमित ने कीटकनाशक द्रव्य पिऊन आत्महत्या केली होती. दोन्हीं भावांनी आत्महत्या केल्याने हे प्रकरण तालुक्यात गाजले होते.