वीरपत्नी गौरी महाडिक झाल्या ‘लेफ्टनंट’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 12:43 AM2020-03-15T00:43:03+5:302020-03-15T00:44:51+5:30

अखेर स्वकष्टाने व हिमतीवर मिळवली सैन्य दलाची ती मानाची ‘कॅप’

Veerapatni Gauri Mahadik becomes 'Lieutenant' | वीरपत्नी गौरी महाडिक झाल्या ‘लेफ्टनंट’

वीरपत्नी गौरी महाडिक झाल्या ‘लेफ्टनंट’

Next

- आशिष राणे
वसई : भारत देशासाठी शहीद झालेले तरुण मेजर प्रसाद महाडिक यांच्या वीरपत्नीने सैन्यात जाऊन ‘लेफ्टनंट’ होत आपल्या शहीद पतीला एक अनोखी आणि मानाची ‘श्रद्धांजली’ अर्पण केली आहे. जिद्ध असेल तर यश दारात आहे आणि अखेरीस वीरपत्नी गौरी यांनी स्वकष्टाने व हिमतीवर सैन्य दलाची ती मानाची ‘कॅप’ मिळवली आहे.
विरारमध्ये स्थायिक आणि गुहाघरच्या कुटगिरीचे सुपुत्र असलेले प्रसाद ऊर्फ राजू महाडिक हे मेजर पदावर भारतीय सैन्यात देशाची सेवा करीत असताना ३० डिसेंबर २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे शहीद झाले होते. दि. १५ फेब्रुवारी २०१५ ला त्यांचा गौरी पवार यांच्याशी विवाह झाला होता. आपले पती सैन्यात आणि तेही एका महत्त्वाच्या सीमेवर तैनात असतात हे माहीत असतानाही गौरी यांनी अत्यंत धाडसाने त्यांची साथ केली. मात्र ही साथ अवघ्या दोन वर्षातच कायमची सुटली. मेजर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. अशा अटीतटीच्या परिस्थितीत त्यानंतरही आपल्या पतीचे देशसेवेचे कार्य पुढे सुरु ठेवण्याचा निर्धार गौरी यांनी केला आणि तशी इच्छा त्यांनी त्यांच्या सासरी व्यक्त केली. त्यांनी लागलीच होकार दिल्यानंतर गौरी यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून लष्करी भरतीची तयारी सुरू केली. त्यानंतर सैन्य दलाच्या सिलेक्शन बोर्डाची आॅनलाईन परीक्षा दिल्यावर त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. पुढे चेन्नईला लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षण केंद्रात ४६ आठवडे खडतर प्रशिक्षण घेऊन आता त्या ‘लेफ्टनंट’ म्हणून देशाची सेवा करण्यास सज्ज झाल्या आहेत.

मेजर प्रसाद यांची
ती आठवण!
तुला जर ही मानाची ‘कॅप’ घालायची इच्छा असेल तर तू सैन्यात भरती हो...! पती मेजर प्रसादसह सेल्फी काढण्यासाठी सैन्य दलाचे चिन्ह असलेली ही ‘कॅप’ गौरी यांनी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी अभिमानाने सांगत, तुला जर ही ‘कॅप’ घालून फोटो काढण्याची तीव्र इच्छा असेल तर तू सैन्यात दाखल हो आणि स्वत: कॅप मिळव, असा मोलाचा सल्ला त्यांनी त्या वेळीच दिला आणि आज अखेर गौरी यांनी स्वकष्टाने व स्वत:च्या हिंमतीवर ही सैन्य दलाची मानाची ‘कॅप’ मिळवलीच!

Web Title: Veerapatni Gauri Mahadik becomes 'Lieutenant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.