भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार; पालघरमध्ये ‘विकेल ते पिकेल’ संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:55 PM2020-12-31T22:55:01+5:302020-12-31T22:55:28+5:30
पालघरमध्ये ‘विकेल ते पिकेल’ संकल्पना : दलालांकडून होणारी लूट थांबणार
पालघर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादित भाजीपाला आता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित योजना पालघर शहरात कार्यान्वित होत असून तहसीलदार सुनील शिंदे यांनी कृषी अधिकाऱ्यांसह बैठक घेत तीन ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दलालांकडून होणारी लूट आता थांबणार असून त्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळत आर्थिक स्तर उंचावणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकार घेणाऱ्या ‘विकेल ते पिकेल’ या कृषी विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीला पालघर तालुक्यात सुरू करण्यात आली आहे. कृषी व पणन विभागाच्या समन्वयाने संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची सुरुवात करून थेट शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्थेला नवीन वर्षात सुरुवात होत आहे. पालघर तहसीलदार कार्यालयासमोर, माहीम रोडवरील कृषी संशोधन केंद्र आवार आणि मनोर मच्छी मार्केटजवळ अशा तीन ठिकाणी विक्री स्टाॅलची जागा निश्चित करण्यात आली आहे.
बुधवारी तहसीलदार सुनील शिंदे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, तालुका कृषी अधिकारी तरुण वैती आदी अधिकाऱ्यांनी प्रगतिशील शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी यांची बैठक पार पडली. ग्राहकांचा जास्तीतजास्त प्रतिसाद मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करून जास्त ग्राहक असलेल्या सोसायट्यांमध्ये कायमस्वरूपी व्यवस्था उभी करण्याचे आदेशही यंत्रणांना देण्यात येणार असल्याने जास्त वस्ती असलेल्या रहिवासी संकुलात ताजा, स्वस्त आणि स्वच्छ भाजीपाला उपलब्ध होणार आहे.