वसईत १४ अधिकाऱ्यांचा वाहनभत्ता झाला बंद; १ मे पासून कार्यवाहीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 01:39 AM2020-05-08T01:39:42+5:302020-05-08T01:39:46+5:30
कोरोनावर नियंत्रण तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत
वसई : पालिकेच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने एकामागून एक निर्णयांचा धडाका घेत असलेल्या वसई-विरार शहर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गंगाथरन डी. यांनी आपला मोर्चा आता अधिकाऱ्यांच्या वाहनांकडे आणि त्यांना मिळणाºया वाहन भत्त्याकडे वळवला आहे. ज्या पालिका अधिकाºयांना फिरस्ती नाही, तसेच वाहनही अनुज्ञेय नाही, अशा १४ अधिकाºयांचे वाहन प्रतिपूर्ती भत्ते बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. या संदर्भात लेखी आदेश काढून १ मे पासूनच हे भत्ते बंद करण्यात आलेले आहेत.
कोरोनावर नियंत्रण तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही मनपा अधिकाºयांना फिरस्ती नाही तसेच वाहन अनुज्ञेय नाही, असे निदर्शनास आल्यावर आयुक्त डी. गंगाधरन यांनी पालिका प्रशासनातील अधिकाºयांचा वाहन प्रतिपूर्ती भत्ता दि. १ मे पासून बंद करत असल्याचे लेखी आदेश दिले आहेत. याचा फटका ज्या १४ अधिकाºयांना बसला त्यात पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांचाही समावेश आहे. पालव यांना दोनपैकी एकाच वाहनाचा वापर आता करता येणार आहे.
राजेश घरत (नगरसचिव), अनुजा किणी (उपमुख्य लेखा अधिकारी), शरद जाधव (उपमुख्य लेखा परीक्षक), अमोल जाधव (कनिष्ठ अभियंता - विद्युत), संजय कडू (कनिष्ठ अभियंता - विद्युत), रवींद्र पाटील (प्र.सहा. आयुक्त - माहिती अधिकार), नीलम निजाई (प्र.सहा. आयुक्त - आस्थापना), संगीता घाडीगावकर (सहा.आयुक्त - आयुक्त दालन), प्रेमसिंग जाधव (सहा. आयुक्त - जनगणना), आर. के. पाटील (शाखा अभियंता), एकनाथ ठाकरे (शाखा अभियंता), प्रदीप पाचंगे (उप अभियंता), प्रकाश साटम (उपअभियंता) यांचा समावेश आहे.
सद्य:स्थितीत महापालिकेच्या उत्पन्नवाढीचे आर्थिक स्रोत बंद असून आरोग्य विभागावर प्रचंड प्रमाणात खर्च आहे. यापूर्वी महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकाºयांना वाहन प्रतिपूर्ती भत्ता दरमहा अदा करण्यात येत होता.