वसईची सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:53 AM2019-11-13T00:53:18+5:302019-11-13T00:53:31+5:30

देवगडचा हापूस, नाशिकची द्राक्षे आणि नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत तशी पालघर जिल्ह्यातील वसईची सुकेळी.

On the verge of extinction? | वसईची सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर?

वसईची सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर?

googlenewsNext

- सुनील घरत 
पारोळ : देवगडचा हापूस, नाशिकची द्राक्षे आणि नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत तशी पालघर जिल्ह्यातील वसईची सुकेळी. एकेकाळी हीच वसईची केळी सुकेळीच्या रूपाने सगळीकडे ओळखली जात होती. मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे वसईतील केळींवर आलेल्या रोगांमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता परतीचा पाऊस अजून मुक्कामी असल्यामुळे वसईतील सुकेळीवर संक्रांत आली आहे.
पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबटगोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही वसईची खास ओळख. अशा सुप्रसिद्ध वसईच्या सुकेळीची चव अजूनही खुद्द वसईकरांना कळली नसल्याबद्दल शेतकरी खंत व्यक्त करतात. या केळ्यांमध्ये विविध जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगले असल्याने ही केळी पौष्टिक असतात. त्याची आंबटगोड चवही चांगली असते. मात्र त्याबद्दल नवीन पिढीला माहिती नसल्याने जागरुकता होण्याची गरज आहे, असे मत नंदाखाल येथील पायस रॉड्रिग्ज हे शेतकरी सांगतात. परतीचा पाऊस लांबल्याने पायस यांचे तब्बल एक लाखांचे नुकसान झाले आहे. गेली ३२ वर्षे पायस रॉड्रीग्ज हे सुकेळी बनविण्याचा व्यवसाय करतात. वसईत राजेळी केळीचे उत्पादन होत नसल्याने केरळ येथे पंधरा दिवस अगोदर आॅर्डर देऊन ही केळी मुंबईत माटुंगा येथे मागवली जातात. त्यानंतर टेम्पो किंवा ट्रकमधून रॉड्रीग्ज आगाशीत ही केळी आणतात.
पायस रॉड्रिग्ज यांचे आजोबा हा सुकेळी बनविण्याचा व्यवसाय करीत असत. त्यांची ही तिसरी पिढी सध्या याच व्यवसायात असून वसईची सुकेळी इतिहासजमा होण्यापासून वाचविण्यात त्यांचा मोलाचा हात आहे. आपली ही वसईची सुकेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी म्हणून ते हा पारंपारिक व्यवसाय करतात.
किलोला ५०० रूपये, तर गावठी राजेळी ८०० रूपये असे वेगवेगळ्या प्रतिनुसार या सुक्यामेव्याला भाव असतात. यावर्षी पाऊस लांबल्याने सूर्यप्रकाश न मिळाल्याने लाखो रूपयांची केळी खराब झाल्याने रॉड्रीग्ज यांना ती फेकून द्यावी लागल्याने त्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत केळी उत्पादकाला अन्य पिकांप्रमाणे नुकसान भरपाई मिळत नसल्याने हा व्यवहार काहीसा बिनभरवशाचा आहे.
महानगरपालिका आणि शासनानेही शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना एक चांगले व्यवसायाचे साधन निर्माण होईल, असे शेतकरी आता सांगत आहेत. वसईत फक्त पायस रॉड्रीग्ज यांसोबत दोन ते तीन
शेतकरीच सुकेळीचा व्यवसाय करतात.
>सुकेळी बनवण्याची पद्धत अत्यंत किचकट
राजेळी जातीची केळी पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकवली गेल्यानंतरच सुकेळी बनविण्यासाठी ती उन्हात सुकविली जातात. सुकवून, केळ्यातला मूळ गोडवा टिकवून सुकेळी तयार करण्याची प्रक्रि या तशी किचकट तर आहेच पण वेळखाऊ तसेच कस पणाला लावणारीही आहे. पावसाळ्याचे तीन महिने सोडले तर सप्टेंबर ते जूनपर्यंतचा हा मोसम सुकेळीसाठी योग्य समजला जातो. केळीच लोंगर कापल्यावर उतरवलेला घड सामान्य वातावरणात ठेवला जातो. त्याचा चीक पूर्णपणे निघून गेल्यानंतर मातीच्या रांजणात सुक्या गवतात ठेवून त्यावर दुसरे मातीचे रांजण ठेवले जाते. केळी पिकवण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे त्यात भाताचे तूस व शेणी यांचा विस्तव करून ऊब देणे. तीन-चार दिवसांत केळी पिकली की ती रांजणातून बाहेर काढली जातात. नंतर ती सोलून उन्हात सुकवली जातात. मात्र ती सोलायची, तीही भल्या पहाटे लवकर. त्यानंतर कडक उन्हात ती केळी सुकवायची. कारवीचा मांडव घालून त्यावर ही सोललेली केळी पसरवली जातात. आठवडाभर रोज ती उन्हात दिवसभर सुकवायला मांडवावर घालायची आणि संध्याकाळी उन्हं उतरू लागली की सूर्यास्ताआधी काढून पुन्हा टोपलीत रचून ठेवायची. नाहीतर काहीवेळा दव पडून ती ओलसर झाली तर सगळी मेहनत गेली असं समजायचं. या केळ्याची जी चव असते, ती येण्यामागे शेतकºयांचे एवढे परिश्रम असतात. सोनेरी रंगाची ही सुकलेली केळी केळ्याच्याच सुकलेल्या पानामध्ये म्हणजेच वावळीमध्ये बांधून विक्रीसाठी नेली जातात. या प्रक्रियेत केळ्यातला नैसर्गिक गोडवा फळामध्ये पूर्णपणे मुरल्याने या केळीची चव टिकून राहते. किलोवर त्याची विक्री केली जात असली तरी ती आता फार कमी शेतकरी बनवत आहेत. साधारण वातावरणात दोन महिने ही सुकवलेली केळी राहतात. फ्रीजमध्ये सहा महिन्यांपर्यंत त्यांची चव आणि रंग चांगला राहतो.

Web Title: On the verge of extinction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.