नालासोपाऱ्यात ३२ किलो ९७० ग्रॅम अफीम एलसीबीने पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 01:02 AM2019-05-29T01:02:20+5:302019-05-29T01:02:26+5:30
एलसीबीची टीम गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत असताना ३२ किलो ९७० ग्रॅम अफीम, २ गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसासह एकाला पकडल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे.
नालासोपारा : विरारच्या पश्चिमेकडील म्हाडा वसाहतीमधून एलसीबीची टीम गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत असताना ३२ किलो ९७० ग्रॅम अफीम, २ गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसासह एकाला पकडल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. एलसीबीने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इतक्या मोठ्या साठ्यासह अफीमचा साठा पकडल्याने नेमके हे कुठून व कोणाला विकण्यास आले होते हा प्रश्न निर्माण झाला आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आणि इतर कर्मचाऱ्यांची टीम विरार पश्चिमेकडील म्हाडा कॉलनीमधून सोमवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास जात असताना बिल्डिंग नंबर सी/११ च्या समोरील रोडवर एक जण मोठी बॅग घेऊन उभे असल्याचे दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्याला विचारणा केली पण त्याने समाधानकारक उत्तर न देता टाळाटाळ करण्यास सुरु वात केल्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याची झडती घेऊन बॅग तपासली असता त्यामध्ये ३२ किलो ९७० ग्रॅम अफीमचा साठा, २ गावठी पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे असा एकूण ६६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. लक्ष्मण नारायण सिंग (२७) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून संजय नावाचा त्याचा साथीदार फरार आहे.