वैतरणा रस्त्यांचे काम सुरु होणार
By Admin | Published: August 11, 2016 03:46 AM2016-08-11T03:46:51+5:302016-08-11T03:46:51+5:30
वैतरणा परिसरातील कणेर ते खाडी- कोशिंबे आणि कणेर ते वैतरणा स्टेशन या महापालिका क्षेत्रातील दोन रस्त्यांचे काम ४५ दिवसांत सुरू केले जाणार आहे
वसई / पारोळ : वैतरणा परिसरातील कणेर ते खाडी- कोशिंबे आणि कणेर ते वैतरणा स्टेशन या महापालिका क्षेत्रातील दोन रस्त्यांचे काम ४५ दिवसांत सुरू केले जाणार आहे. २०१४ मध्ये याबाबतचा मंजूर झालेला ठराव अमलामध्ये यावा यासाठी बुधवारी शिवसेना व आगरी सेनेने कणेर फाटा येथे रास्ता रोको केला. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून त्याने हे आश्वासन दिले.
सकाळी अकराच्या सुमारास कणेर येथे मोठ्या प्रमाणात जमलेल्या शिवसैनिक आणि आगरी सेनेचे कार्यकर्ते यांनी महामार्ग - विरार आणि वैतरणा परिसरात जाणारे दोन्ही रस्ते सुमारे २ तास रोखले. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी वसई- विरार शहर महापालिका भ्रष्ट होत चालली असून, सत्ताधारी बहुजन विकास आघाडी ग्रामीण भागाचा विकास करण्यात असमर्थ ठरली आहे. ३० वर्ष वैतरणा परिसरातील जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे. निवडणूक आली की येथील पाणीपुरवठा आणि रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आणायचा आणि नंतर येथे फिरकायचेही नाही असा त्यांचा कारभार सुरु आहे. दोन्ही रस्त्यांचे कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु झाल्याशिवाय आता शांत बसणार नाही. यावेळी शिवसेना विरार शहरप्रमुख दिलीप पिंपळे यांनी सत्त्ताधारी बविआचा चांगलाच समाचार घेतला नगरसेवक,आमदार आणि आयुक्त यांना येथील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही, मात्र गावे महापालिकेत पाहिजेत, कशासाठी? असे सांगून रस्त्यांसाठी २५ कोटी ८४ लाख रू मंजूर करण्यात आले. (वार्ताहर)