वेवजीपाडा शाळा डिजिटल

By admin | Published: July 29, 2016 02:49 AM2016-07-29T02:49:52+5:302016-07-29T02:49:52+5:30

तलासरी तालुक्यातील वेवजी केंद्र शाळेअंतर्गत शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आदिवासी पाड्यांवरील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्ययन- अध्यापनाचे

Vevgipada School Digital | वेवजीपाडा शाळा डिजिटल

वेवजीपाडा शाळा डिजिटल

Next

- अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी

तलासरी तालुक्यातील वेवजी केंद्र शाळेअंतर्गत शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आदिवासी पाड्यांवरील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्ययन- अध्यापनाचे कार्य ई लर्निंग द्वारे सुरू झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भारतातील खेडोपाड्यातील शाळांमध्ये डिजटल शिक्षणाची सोय उपलब्ध करून ई लर्निग द्वारे अध्ययन-अध्यापन कार्य चालविण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार शहरातील शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झाल्यानंतर तो आता खेडोपाड्यांपर्यंत पोहचला आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्याच्या वेवजी या दुर्गम आदिवासी गावात डिजिटल शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. जिल्हा परिषदेच्या वेवजी केंद्र शाळेअंतर्गत अकरा शाळांचा समावेश असून आतापर्यंत नऊ शाळा ई लर्निगने जोडल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षी नानापाडा, तरियापाडा, पाटीलपाडा या तीन शाळा डिजिटल झाल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्षापासून डोंगरपाडा, गोरखनपाडा, वांगडपाडा, सिगलपाडा, काटीलपाडा, सोनारपाडा या आदिवासी पाड्यांवरील शाळांमध्ये वेवजी ग्रामपंचायतीने पेसा कायद्यातील आर्थिक तरतुदीनुसार लॅपटॉप, प्रोजेक्टर, स्पीकर आदी साहित्य पुरविल्याने या शाळा डिजिटल बनल्या आहेत. उर्वरित वेवजी गुजराती आणि बाबलपाडा या दोन शाळा पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत डिजिटल करण्याचे उद्दीष्ट ठरविल्याचे केंद्र प्रमुख नवनाथ जाधव यांनी सांगितले.
त्यामुळे आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना गुणवत्तेच्या बाबतीत स्पर्धा निर्माण केली आहे. या सुविधांमुळे आमचा पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असल्याचा सार्थ अभिमान पालकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान या उपक्रमाकरिता आर्थिक मदत देण्यासाठी दात्यांनी संबंधित शाळेच्या शाळव्यावस्थापन समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेवजी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तारअधिकारी चाबके संबंधित शाळांचे मुख्यध्यापक आणि उपशिक्षकांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याचे केंद्रप्रमुख नवनाथ जाधव यांचे म्हणणे आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महावितरणने किमान शाळेच्या वेळेत तरी वीजपुरवठा अखंडित ठेवावा अशी अपेक्षा विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी व्यक्त केली आहे.

वेवजी केंद्रशाळेअंतर्गत सर्व शाळा डिजिटल करण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. त्यामुळे आगामी काळात मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा दर्जा अधिक उंचावणार आहे.
- नवनाथ जाधव, केंद्रप्रमुख विवजी केंद्रशाळा.

Web Title: Vevgipada School Digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.