विक्रमगडमध्ये लाभले जखमी फ्लेमिंगोला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:23 AM2017-07-19T02:23:17+5:302017-07-19T02:23:17+5:30
विक्रमगड-ओंदे येथील रहीवासी ज्ञानेश्वर भगवान जाधव यांच्या शेतामध्ये सायंकाळच्या सुमारास युरोप-सायबेरिया या भागातील फ्लेमिंगो हा पक्षी जखमी अवस्थेत
विक्रमगड : विक्रमगड-ओंदे येथील रहीवासी ज्ञानेश्वर भगवान जाधव यांच्या शेतामध्ये सायंकाळच्या सुमारास युरोप-सायबेरिया या भागातील फ्लेमिंगो हा पक्षी जखमी अवस्थेत सापडला असून त्यांनी पक्षीमित्र दिलीप नारायण खुताडे यांच्या मदतीने भर पावसामध्ये ३ कि़ मी़ चा प्रवास करुन त्याला वनक्षेत्र कार्यालयाच्या स्वाधीन केले़
येथील वनरक्षक अधिकाऱ्यांनी त्यांला एका उब देणा-यापेटीत ठेऊन त्याची रात्रभर काळजी घेतली व जखमेवर मलमपटटी करुन त्यास खाद्य दिले़ आज या पक्षास येथील अधिकारी ठाणे-मुंबई येथील खाडीत सोडणार असल्याचे सांगितले़
या दोघांच्या धडपडीमुळे या जखमी फ्लेमिंगोला जीवनदान लाभले आहे. मात्र यावेळी सायंकाळ असून या पाहुण्या पक्षालां पाहाण्याकरीता परिसरातील लोकांनी गर्दी केली होती व आपल्या मोबाईल व कॅमे-यामध्ये या पक्षाचे चित्रीकरण करून व फोटो काढून घेतले़ हे पक्षी पावसाळयामध्ये समुद्रसपाटीच्या भागामध्ये युरोपीयन देशातून भारतातील पाणथळ भागात आणि खाडी परीसरात स्थलांतर करीत असताात. त्यांच्या बरोबर इतर लोसी, आईबीस व अन्य पक्षीही स्थलांतरीत होत असतात. या भागामध्ये पावसाळयात दलदलीचा प्रदेश वाढल्याने त्यात आढळणाऱ्या वनस्पती शेवाळे व छोटे मासे अतिशय प्रिय असल्याने हे पक्षी या परीसरात येत असतात. सध्या हे पक्षी वसई, नालासासेपारा, विरार, भाईंदर या खाडी किना-यावर दिसत आहेत़ परंतु तो जखमी कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळालेले नाही.