खराब रस्त्यामुळे आणखी एकाचा बळी
By admin | Published: September 9, 2016 02:27 AM2016-09-09T02:27:41+5:302016-09-09T02:27:41+5:30
खराब प्रतीच्या रस्ते कामाकरिता सुप्रीम इन्फ्र ास्ट्रक्चर या कंपनीविरोधात जिल्ह्याच्या ठिकाणी नुकतेच निलेश सांबरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण केले.
वाडा : खराब प्रतीच्या रस्ते कामाकरिता सुप्रीम इन्फ्र ास्ट्रक्चर या कंपनीविरोधात जिल्ह्याच्या ठिकाणी नुकतेच निलेश सांबरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण केले. या धसक्याने कंपनीने रस्त्यांना तात्पुरती डागडुजी करण्याचा देखावाही केला. मात्र, सोमवारी गणपती आगमनाच्याच दिवशी डाकिवली गावातील एका तरूणाचा खराब रस्त्यामुळे बळी गेल्याने ही सर्व मलमपट्टी कुचकामी असल्याचेच सांगून गेली.
गणेश रवींद्र बंदरे ( २८) हा डाकिवली येथील तरूण चिखले येथून नातेवाइकांकडील गणपतीचे दर्शन घेऊन परतत असतांना कुडूस येथील पेट्रोलपंपाजवळ खड्ड्यांत मोटारसायकल आदळून समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक बसून त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी खुपरीनजीक कंचाडफाटा येथे कार व एसटीचा अपघात झाला.
रस्ता दुरूस्तीदरम्यान, भरलेल्या खड्ड्यांतील माती व खडी आजूबाजूला पसरल्यामुळेच गणेश यांचा गाडी घसरून मृत्यू झाला. तर कंचाडफाटा येथील अपघात अरूंद रस्त्यामुळे झाला आहे. यामुळे कंपनीविरोधात जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. प्रशासनाने सुप्रीम कंपनी व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व अपघातग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील व नितेश नाईक यांनी दिला आहे. या अपघातामुळे रस्त्याच्या निकृष्टचेचा विषय चर्चेत आला आहे.
वसई/पारोळ: तालुक्यातील सोमवारी झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातांत एक जण ठार तर सात जण जखमी झाले असून जखमींपैकी तिघे गंभीर आहेत. सर्व जखमींना नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून नजीकच्या दवाखान्यात हलवण्यात आले असून उपचार सुरु आहेत. या अपघातांमध्ये मुंबई कर्णावती महामार्गावरील बावखळ वाघोबा मंदिरासमोरील गुजरात वाहिनीवर बाइक ओव्हरटेक करत असताना पुढे चालणाऱ्या दुसऱ्या बाइकला मागून धडकल्याने धडक देणाऱ्या बाइकवर पाठीमागे बसलेला हनुमंत रामू सापळे-३१ सातिवली, वसईफाटा हा ठार झाला असून चालक गणेश दांडेकर ३० हा जबर जखमी झाला आहे. धडक लागलेल्या बाइकचा चालक सत्यवान महादेव भोसले, झेंडा बाजार वसई हा जखमी झाला आहे.