हलगर्जीमुळे कंत्राटी वीज कामगाराचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:22 AM2018-11-18T00:22:32+5:302018-11-18T00:22:45+5:30
महावितरण ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी यांनी आपल्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे वैभव पंगारा (२५) या कंत्राटी कर्मचाऱ्यांला जीव गमवावा लागला आहे.
वाडा : महावितरण ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी यांनी आपल्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे वैभव पंगारा (२५) या कंत्राटी कर्मचाऱ्यांला जीव गमवावा लागला आहे. हा प्रकार शुक्र वारी संध्याकाळी साडेसात वाजता अभनपाडा (अबिटघर) येथे घडला.
अबिटघर येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वाडा विभागाचे कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी हे ग्रामीण भागात कंत्राटी काम करणाºया तीन कामगारांना घेऊन गेले. अबिटघर येथील वीज उपकेंद्र (स्विचींग हाऊस) येथे बिघाड असल्याने या ठिकाणी उच्च दाबाने (२२ के.व्ही.) आलेला विद्युत प्रवाह बंद न करता कनिष्ठ अभियंता चौधरी यांनी कंत्राटी कामगारांकडून काम करण्यास सुरवात केली.
उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरु च ठेवल्याने या ठिकाणी काम करीत असलेला कंत्राटी कर्मचारी वैभव पंगारा यास विजेचा जोरदार शाँक लागला व तो जागीच ठार झाला. ही घटना कनिष्ठ अभियंता ब्रम्हानंद चौधरी यांच्या उपस्थितीत होऊनही त्यांनी कुठलीही तत्परता दाखवली नाही.
या बेजबाबदारपणा बद्दल त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मरण पावलेल्या या कंत्राटी कामगाराच्या कुटूंबियांनी केली आहे. ती न केल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी वाडा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केला आहे. या अपघातामध्ये प्रवीण तरसे हा कामगारही जखमी झाला आहे.