जव्हारमध्ये आवाज शिवसेनेचाच....! नगराध्यक्षांसहीत 9 जागांवर विजय, जव्हार प्रतिष्ठानला 1 जागेवर समाधान, NCPनं राखल्या 6 जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 04:31 PM2017-12-18T16:31:18+5:302017-12-18T16:34:24+5:30
जव्हारकरांनी शेवटी अपक्षांना धूळ चारत शिवसेनेला कौल दिला असून शिवसेनेने जव्हार नगरपरिषदेवर भगवा फडकत जव्हारमध्ये आवाज शिवसेनेचाच हे सिद्ध केले आहे.
जव्हार - जव्हारकरांनी शेवटी अपक्षांना धूळ चारत शिवसेनेला कौल दिला असून शिवसेनेने जव्हार नगरपरिषदेवर भगवा फडकत जव्हारमध्ये आवाज शिवसेनेचाच हे सिद्ध केले आहे. एकूण १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत पटेल हे १९२ मतांनी विजय झाले तर सेनेने ९ नगरसेवक आणत आपले वर्चस्व प्रस्थापित केले यावेळी गत निवडणुकीत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला ६ जागांवर समाधानी राहावे लागले तर जव्हार प्रतिष्ठान आणि भाजपा युतीला मतदारांनी नाकारले असून त्यांच्या पदारात २ जागा टाकल्या.
अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या जव्हार नगरपरिषद निवडणुकीत अपेक्षित निकाल लागला असून सेनेने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या ९ जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. तर राष्ट्रवादीने ६ जागा जिंकल्या मात्र सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा असलेल्या जव्हार प्रतिष्ठानचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत पाटील यांनी फक्त नगराध्यक्षपदासाठीच नंबर दोनची मते मिळवली मात्र प्रभाग निहाय नगरसेवक पदांचे उमेदवार पुरते ठेपाळले दिसले तर ५ जागा लढविणाऱ्या भाजपाला एका जागेवर यश मिळाले तर स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसचा मात्र सुफडा साफ झाल्याचे चित्र होते.
जव्हारच्या निवडणुकीत शेवटी शेवटी वैयक्तीक पातळीवरही प्रचार झाला मात्र त्याला जव्हार करानी भीक न घालता सेनेला पसंती दिल्याचे दिसले या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष रीयाज मनियार शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष गणेश राजपूत माजी नगरसेविका मनिषा वाणी आशा बल्लाळ यांना पराभवाची धूळ चाखावी लागली तर दुसरीकडे रजपुत आणि मनियार या दोघांच्या पत्नी मात्र निवडून आल्या. एकूणच दिग्गजांच्या प्रचार सभा, निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक रसद कार्यकर्त्यांची फौज आणि शेवटच्या क्षणापर्यंत गाफिल न झालेले शिवसैनिक यांच्या बळावर ही निवडणूक सेनेला जिंकता आली.
या लढती राहिल्या लक्षात
यामध्ये प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीचे रहीम लुलानिया आणि सेनेच्या गणेश रजपूत यांच्यात चुरशीची लढाई झाली यामध्ये लुलानिया यांनी मात दीली तर आधीपासूनच लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग ५ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक कांगणे यांनी एकाहाती ही निवडणूक जिंकत सर्वाधिक ३९७ मताधिक्याने जिंकणारे एकमेव नगरसेवक ठरले तर प्रभाग ७ मधील वैभव अभ्यंकर आणि सेनेचे चित्रांगण घोलप यांच्या अटीतटीची लढाई झाली यात अभ्यंकर यांचा अवघ्या २२ मतांनी विजय झाला.तर १०० वर्षांच्या इतिहासात मुस्लिम महिला नगरसेविका म्हणून रश्मी रीयाज मणियार या निवडून आल्या.
...असेही घडले
जव्हार नगरपरिषद निवडणूकीत सुरुवातीला नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीच बंडखोरी झाली यावेळी जव्हारमधील दिग्गज नेते दिलीप तेंडुलकर यांनी बंड करीत कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवली यामुळे सुरुवातीला जव्हार प्रतिष्ठानचे भरत पाटील राष्ट्रवादीचे संदीप वैद्य सेनेचे चंद्रकांत पटेल आणि कॉंग्रेस पुरस्कृत दिलीप तेंडुलकर अशी लढत होती मात्र यानंतर अचानकपणे सेना आणि राष्ट्रवादीमध्येच लढत दिसून आली मात्र निकालानंतर अनपेक्षितरित्या राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकली गेली तर प्रतिष्ठान आणि काँग्रेस पुरस्कृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना स्वतःपुरतीच मते मिळाल्याचे दिसले यामुळे राष्ट्रवादीचे ६ नगरसेवक येऊनही नगराध्यक्षपदाचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिले तर नगरसेवकांची संख्या शुन्य असूनही प्रतिष्ठान आणि कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार मात्र नंबर दोन आणि तिन वर राहीले.
प्रभाग निहाय विजयी उमेदवार त्यांना पडलेली मते आणि पक्ष
जव्हार नगर परिषद विजयी उमेदवार
1. राजपूत पद्मा गणेश - शिवसेना मिळालेली मते-301
2. माळगावी संकेत अशोक - शिवसेना - 285
3. सोनावणे स्वाती अजय -शिवसेना - 262
4. वाघमारे यतीन काशीनाथ -अपक्ष - 259
5. लुलनिया रहीम करीम- राष्ट्रवादी - 259
6. अहिरे विशाखा भीमराव-राष्ट्रवादी - 232
7. उदावंत कुणाल प्रदीप-भाजप - 254
8. अहिरे संगीता नंदकिशोर-शिवसेना - 243
9.कांगणे दीपक मारुती- राष्ट्रवादी - 524
10. कुवरा कमल कामळकर- राष्ट्रवादी - 422
11. चव्हाण सुनीता परशुराम - शिवसेना - 284
12. औसरकर अमोल मधुकर- शिवसेना -425
13. अभ्यंकर वैभव श्रीकांत- राष्ट्रवादी - 254
14. चव्हाण जयश्री रवी - शिवसेना - 306
15. भोये विनोद बालु- शिवसेना 506
16. तामोरे हर्षदा कपील- शिवसेना - 528
17. मनियार रश्मीन रियाज - राष्ट्रवादी 492
तर नगरध्यक्ष चंद्रकांत (भिकू)पटेल 1768
दीपक कांगणे