Video : बुडणाऱ्या तीन बालकांचे प्राण मित्रांनी वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 06:17 PM2019-04-10T18:17:49+5:302019-04-10T18:20:06+5:30
आगवन खाडीत मासेमारी दरम्यानची घटना; अल्पवयीन दोघांची प्रकृती चिंताजनक
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी - आगवन गावातील मोठापाडा या आदिवासी वस्तीतील आदित्य देवजी गोधाले (9वय), प्रीतम सुरेश महालुंगे (9वय) आणि त्याचा भाऊ सुयश सुरेश महालुंगे (6 वय) ही शाळकरी मुले मंगळवार, 9 एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नजीकच्या खाडीत खेकडे पकडायला गेली असताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. सुदैवाने सोबतचे मित्र मदतीला धावल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
आगवनच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थी सकाळच्या सत्रातील शाळा संपवून घरी परतले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गावनजीकच्या खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेले होते. वरील तिघे खाडी पात्रातील गुढगाभर पाण्यात मासेमारी करण्यात गुंग असताना समुद्रात आलेल्या भरतीने खाडीतील पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेली. मात्र हे कळायच्या आत ते बुडाले, त्यांना पोहता येत नसल्याने ते गटांगळ्या खाऊ लागल्याचे जवळच असलेल्या भावेश गोविंद गहला, अमृत गोविंद गहला, आकाश देवाजी गोधाले यांनी पाहिल्यानंतर मदतीला धावून जात पहिल्यांदा सुयशला आणि त्यानंतर आदित्य व प्रीतमला काठावर काढले. प्रसंगावधान राखत उमेश, आशिष वेणू दळवी, आरुष वेणू दळवी तसेच अन्य मुले मदतीला धावून गेली. आदित्य व प्रीतम बेशुद्धावस्थेत होते. त्यांना ग्रामस्थ आणि पालकांच्या मदतीने पावणेसातच्या सुमारास आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर आदित्य व प्रीतम यांना आयसीयूची गरज असल्याने तासाभरानंतर अधिक उपचाराकरिता सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात पाठविल्याची माहिती, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रभाकर भोये यांनी लोकमतशी बोलताना दिली.
दरम्यान, या तिन्ही बालकांचे प्राण वाचविणारी मुले त्याच आगवनच्या आदिवासी पाड्यावरील असून त्यांचे वय दहा वर्षाच्या आतील आहे. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक पंचक्रोशीत होत आहे. सुयश हा आगरच्या रुग्णालयात दाखल असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याची आई रवू आणि नातेवाईक सोबत असून त्याने घडला प्रकार सांगितला.