विक्रमगडकरांना हवे आहे नवीन बसस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:16 PM2020-02-17T23:16:11+5:302020-02-17T23:16:29+5:30
प्रवाशांचे हाल : पिकअप शेडवर भागवले जाते काम
विक्रमगड : विक्रमगड तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत एस.टी. बसस्थानकच नसल्याने येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हांत, पावसाळ्यात पावसात तासन्तास ताटकळत येथील प्रवाशांना एस.टी.ची वाट पाहावी लागते. विक्रमगड हे तालुक्यातील शहराचे मुख्य ठिकाण असतानाही येथे तालुका निर्मितीपासून बसस्थानक नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २० वर्षापासून उपलब्ध पिकअप शेडवर काम भागविले जात आहे. या ठिकाणी अद्ययावत बसस्थानक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असतानाही याकडे कुणीही गांभीर्याने पाहात नाही.
विक्रमगड तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लाखांच्या घरात जाऊन पोहचली आहे. तर विक्रमगड शहराची लोकसंख्या २५ हजारावर गेली आहे. येथून दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाºया अंदाजित ६० ते ७० एस.टी. बसेस सुटतात. विक्रमगड शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालय, इंजिनीअरिंग कॉलेज, आय.टी.आय. व विविध आस्थापनांमध्ये काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस.टी.चे असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र आजही गेल्या तालुका निर्मितीच्या २० वर्षापासून सुविधांविना विक्रमगड मुख्यालयी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे साधे पिकअप शेड आहे, तेही प्रवाशांना असून नसल्यासारखेच आहे. कारण बस पिकअप शेडसमोर एसटी बस थांब्यांसाठी जागाच शिल्लक राहात नाही, तर प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा नाही. विक्रमगडसाठी असलेली सद्यस्थितीतली पिकअप शेड २० वर्षापूर्वी खासदार निधीतून बांधलेली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रसाधनगृहाचीही सोय नाही
च्विक्रमगड शहर हे तालुक्यातील ९४ गावपाड्यांचे मुख्यालय असल्याने दररोज गाव-खेड्यापाड्यांतून तसेच शहरांतून विक्रमगडमध्ये अगर विक्रमगडहून एस.टी. बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र तालुक्याचे मुख्यालय असूनही विक्रमगड शहरात अद्यापही अद्ययावत असे एसटी बसस्थानक नाही.
च्परिणामी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वृद्ध, रुग्ण, महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अशा प्रवाशांचे तर हाल पाहावत नाहीत.