गाव, पाडा मुख्य रस्त्याला जोडणार!
By admin | Published: June 28, 2016 03:12 AM2016-06-28T03:12:23+5:302016-06-28T03:12:23+5:30
गांवे मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरु केले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी रविवारी(२६ जून) पीक येथे केले.
वाडा : येत्या दोन वर्षात पालघर जिल्हयातील प्रत्येक गांव, पाडयांपर्यंत पक्के रस्ते बांधून ही गांवे मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरु केले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी रविवारी(२६ जून) पीक येथे केले.
वाडा तालुक्यातील पीक-डाहे या दीड कोटी रु पये खर्चाचे अंदाजपत्रक असलेल्या रस्त्याचे भूमीपूजन विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. आपण मंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून या जिल्हयातील रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या विषयांना अग्रक्रम दिला असून अवघ्या दीड वर्षातच पालघर जिल्ह्यात सातशे कोटीहून अधिक रुपये खेडोपाडयातील रस्त्यांसाठी मंजूर केले आहेत. या रस्त्यांची कामेही सुरु झाली आहेत. येत्या दोन वर्षात ग्रामीण भागातील प्रत्येक रस्ता मुख्य रस्त्याला जोडला गेलेला असेल असेही सांगितले. या कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रदेश सदस्य बाबाजी काठोळे, तालुकाध्यक्ष संदिप पवार, जिल्हा सरचिटणीस विजय औसरकर, डॉ. हेमंत सवरा आदिवासी आघाडीचे रविंद्र जोगवला आदी मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)
>आदिवासी उपयोजनेत समावेश असलेल्या प्रत्येक गावातील नागरिकांनी आदिवासी विकास खात्यातील विविध योजनांचा लाभ घेवून आपला आर्थिक स्तर उंचवावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
बचत गटांना लहान उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत अथवा प्रत्यक्ष साहित्य देण्याचे कामही सुरु केले आहे. बचत गटांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सवरा यांनी केले.
यावेळी सवरा यांच्या हस्ते पीक येथील महिला बचत गटांना कॅटरर्सचे साहित्य तर पुरुष बचत गटांना बॅन्जो (वाद्य) साहित्याचे वाटप करण्यात आले.